Latest

अहमदनगरच्या कच्च्या साखरेची गोडी सातासमुद्रापार

अमृता चौगुले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : साखरेचे कोठार म्हणून ओळखल्या जाणार्‍या नगर जिल्ह्यातील 22 व नाशिकच्या चार कारखान्यांकडे मागील 3384 व यंदाची 1,47,653 मे.टन. कच्ची साखर विदेशात निर्यात करण्यात आली आहे. तर, पांढरी साखरही तब्बल तीन लाख मे.टन. विदेशात विक्री केल्याचे समजले आहे. केंद्राने शेतकर्‍यांच्या हितासाठी निर्यातीवरील नियंत्रण हटविल्यास कारखान्यांचेही विदेशात साखर विक्रीसाठी मार्ग मोकळे होणार आहेत.

1 ऑक्टोबर 2022 रोजी नगर-नाशिकच्या साखर कारखान्यांकडे मागील वर्षीच्या गाळपातील कच्ची व पांढरी अशी सुमारे 2 लाख 90 हजार मे.टन साखर शिल्लक होती. त्यानंतर या वर्षीचा गाळप हंगाम मार्चमध्येच आटोपला. ऊसक्षेत्र कमी असल्याने गाळपही कमी झाले, त्यामुळे साखर उत्पादनातही घट दिसली.

सुमारे 12 लाख मे.टन साखरेचे उत्पादन

जिल्ह्यातील सात खासगी व 15 सहकारी आणि नाशिकच्या चार कारखान्यांनी मिळून 11 लाख 81 हजार मे.टन. कच्ची व पांढरी साखर उत्पादित केली. यात कच्ची साखर ही 1 लाख 47 हजार मे.टन होती. तर पांढरी साखर ही 10 लाख 33 हजार मे.टन आली.

नगरच्या साखरेला वाढती मागणी

नगरसह देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन होते. त्यातून इथेनॉल निर्मितीकडेही कारखानदार वळले आहेत. तर अरब देश, आफ्रिकी देश, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश या आशियाई देशांतूनही नगरच्या साखरेला मागणी आहे. या ठिकाणी साधारणतः 52 रुपये किलोपेक्षा अधिक दर आहे. नगरमधील कच्ची साखर ही देशांतर्गत 1199, तर देशाबाहेर सुमारे दीड लाख 50 मे.टन निर्यात करण्यात आली आहे. याशिवाय पांढरी साखरही देशातर्गंत 4 लाख 31 हजार मे.टन, तर देशाबाहेर 1 लाख 47 हजार 575 मे.टन विक्रीसाठी पाठविल्याचे अहवालातून दिसत आहे.

देशांतर्गत बाजारपेठेत भाव

गेल्या महिन्यात विक्री केलेल्या कच्च्या साखरेला 3333-3654 आणि पांढर्‍या साखरेच्या एस 30- क्विंटलला 3100 ते 3266 रुपये भाव मिळाला. एम 30- 3220 ते 3429, एल 30-3210 ते 3364 रुपये दर सापडल्याचे आकडे बोलत आहेत. दरम्यान, गतवर्षी राज्यात 137 दिवस गाळप चालले होते, तर यावर्षी 105 दिवसच गाळप चालले. त्यामुळे उत्पादनात घट असली तरी तीही साखर देशाला तुटवटा भासणार नसल्याचेही सांगितले जाते.

दीड लाख मे. टन निर्यात

कच्ची व पांढरी साखर गोषवारा
चालू वर्षी उत्पादन ः 11,81,420 मे. टन
मागील वर्षीचा शिल्लक ः 2,90,872 मे. टन
एकूण साखर साठा ः 14,72,292 मे. टन
विदेशात निर्यात साखर ः 2,97,000 मे. टन
देशात विकलेली साखर ः 4 लाख 35 मे. टन
शिल्लक असलेली साखर ः 7,40,077 मे. टन

विदेशात कच्च्या साखरेवर प्रक्रिया!

केंद्र सरकारने निर्यात धोरणांनुसार कारखान्यांना कोटा ठरवून दिलेला आहे. त्यामुळे मागणी असूनही त्यांना कोट्यापेक्षा अधिक साखर बाहेर पाठविता येत नाही. निर्यात केल्या जाणार्‍या कच्च्या साखरेचे शुद्धीकरण करून त्यातून 15 ते 16 प्रकारची साखरनिर्मिती केली जाते. रिफाईंड केलेल्या साखरेला 70 ते 80 रुपये किलो दर मिळतो. शिवाय अन्य वापरातून मानवी औषधांसह अन्य केमिकल्ससाठीही कच्च्या साखरेचा उपयोग होतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT