Latest

संगमनेर: शहरातील दोन कत्तलखान्याचे मालक नगर जिल्ह्यातून हद्दपार

अमृता चौगुले

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही बेकायदा गोवंशाची हत्या करणे, त्याची अवैध वाहतूक करणे, आदी प्रकारात वारंवार सहभागी असलेल्या भारत नगर या भागात राहणाऱ्या दोन कत्तलखान्याच्या मालकांना पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांनी वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला होता. संगमनेर शहरातील भारतनगर, जमजम कॉलनी, कोल्हेवाडी रोड, मदिनानगर, मोगलपुरा या भागात शहर पोलिसांनी वारंवार छापे टाकून आजवर हजारो किलो गोवंशाच्या मांसासह जिवंत जनावरांचीही सुटका केली आहे. अशा प्रकारच्या कारवायांमध्ये पोलिसांनी दोनशेहून अधिक गुन्हे दाखल करून अनेक जणांना अटक केली होती. तरीसुद्धा गोहत्या करण्याचा व्यवसाय थांबत नव्हता.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल वाहिद अब्दुल करीम कुरेशी याच्यावर गोवंश हत्याबंदी कायद्यान्वये शहर पोलीस ठाण्यात तब्बल १३ तसेच नवाज कुरेशी याच्यावर ९ गुन्हे दाखल आहेत. या दोघांवर कठोर कारवाई करण्याच्या हेतूने त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव संगमनेर विभागाचे प्रांताधिकारी तथा दंडाधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांना पाठविला होता. त्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून वरील कत्तलखान्याच्या मालकांना पोलीस उपाधीक्षक मदने यांनी एकवर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

SCROLL FOR NEXT