शिर्डी; पुढारी वृत्तसेवा : पदविधर मतदार संघ निवडणुकीत मविआने चांगलीच मुसंडी मारली, असे सांगत नाशिक पदवीधर मतदार संघात विजयी झालेले सत्यजित तांबे अपक्ष निवडून आले असले तरी ते जन्मतः काँग्रेसचेच आहेत, असा दावा माजी मंत्री, आ. विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आ. वडेट्टीवार काल (शनिवारी) शिर्डीत श्रीसाई दर्शनासाठी आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते.
समवेत मतदार संघातील कार्यकर्ते होते. आ. वडेट्टीवार म्हणाले, सत्यजित जन्मतःच काँग्रेस विचारांचे आहेत. पक्षातील एखाद्या व्यक्तीबद्दल राग असू शकतो, मात्र त्यांचा पक्षावर राग नाही. विधान परिषदेच्या 5 पैकी 4 जागा महाविकासने जिंकल्याचे आपण मानत असून, श्रीसाईबाबांच्या दरबारी दर्शनास असल्याचे ते म्हणाले.
सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीबद्दल नेमक काय झाले, ही भूमिका ते मांडणारच आहेत, मात्र भाजप आयत्या बिळावर नागोबा आहे. संधी मिळाली तर सोडणार नाही. तांबे आपली भूमिका मांडत आहेत, मात्र ते काँग्रेसचे असून आमचेच आहेत, असे आ. वडेट्टीवार यांनी ठणकावून सांगितले. श्रीसाई संस्थानच्या वतीने आ. वडेट्टीवार त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चौगुले आदी उपस्थित होते.