Latest

ऊस दरासाठी सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको

नंदू लटके

सांगली; पुढारी वृत्तसेवा : उसाला टनाला तीन हजार पाचशे रुपये द्या, गेल्या हंगामातील 400 रुपये द्या, अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रविवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. परिणामी, अनेक ठिकाणी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. काही ठिकाणी ऊस तोडी बंद पाडल्या. वाहनांचीही तोडफोड करण्यात आली.

सांगली-इस्लामपूर मार्गावर लक्ष्मी फ ाटा येथे रास्ता रोको करण्यात आला होता. परिणामी, वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याठिकाणी वाहनधारक, पोलिस आणि कार्यकर्र्ते यांच्यामध्ये किरकोळ वादावादी झाली. पलूस तालुक्यात विजापूर- गुहागर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला.
कवठेमहांकाळ तालुक्यामधील जत-सांगली रोडवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस वाहतूक करणारे टॅ्रक्टर अडवून रास्ता रोको करण्यात आला होता. तासगाव तालुक्यातील विटा-तासगाव रोडवर बोरगाव फाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

इस्लामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन केले. यामुळे सुमारे सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मागण्या मान्य नाही झाल्या तर संघटनेने आणखी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आंदोलन आणखी चिघळणार आहे. ताकारी (ता.वाळवा) येथे रास्ता रोको करीत चक्काजाम आंदोलन केले. यामुळे सुमारे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनाचे नेतृत्व पोपट मोरे, महेश खराडे, संदीप राजोबा, संजय बेले, भागवत जाधव, संजय खोलखुंबे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT