Latest

जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी आंदोलन; राष्ट्रवादी आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

backup backup

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

म्हाडाची परीक्षा ऐनवेळी रद्द केल्याने याचा जाब विचारण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी सोमवारी आंदोलन केले.

मात्र आव्हाड यांच्या निवस्थानाच्या बाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही देखील मोठया संख्येने उपस्थित झाल्याने आपल्या नेत्याच्या निवासस्थानी आंदोलन करणाऱ्या अभाविपच्या कार्यकत्यांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये यामुळे हाणामारी झाल्याने आव्हाडांच्या निवासस्थानी तणाव निर्माण झाला होता.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने प्रकरण आणखी चिघळू नये यासाठी पोलिसांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना आंदोलनाच्या ठिकाणी बाहेर करत त्यांना ताब्यात घेतले. यावेळी अभाविपच्या कार्यकत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही अभाविपच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले.

म्हाडाची परीक्षा रद्द झाल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आदल्या दिवशी रात्री ट्विट करून दिली. दुसऱ्या दिवशी जितेंद्र आव्हाड यांनी रीतसर पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात सविस्तर माहिती देखील दिली होती. पेपर फुटला असता तर मोठी नामुष्की झाली असती, तसेच हजारो विद्यार्थी जे मेहनत करून परीक्षा देणार होते त्यांचे भवितव्य धोक्यात आले असते. सरकार जागरूक होते म्हणून पेपर फुटले नाही, तसेच विद्यार्थ्यांनी दिलेले शुल्क परत करून पुन्हा परीक्षेसाठी शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे सांगून आव्हाड यांनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी देखील मागितली होती.

सोमवारी मात्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अचानक जितेंद्र आव्हाड यांच्या निवास्थानी आंदोलन करण्यास सुरुवात केली. अभाविपच्या २५ ते ३० कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवास्थानी आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे देखील कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आहे. आपल्या नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु असल्याचे पाहून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतेही आक्रमक झाले. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, मात्र बंगल्याच्या बाहेर लावण्यात आलेले बॅरिकेट्स तोडून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अभाविपच्या कार्यकर्त्यांना भिडले. यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी देखील झाली.

अखेर पोलिसांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्या नंतर तणाव कमी झाला. राष्ट्रवादीच्या गुंडांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करून हल्ला केला. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी राष्ट्रवादीच्या गुंडांच्या विरोधात बघ्याची भूमिका घेऊन अभाविप कार्यकर्त्यांवरच लाठीमार केल्याचा आरोपही अभाविपच्या वतीने करण्यात आला आहे . दरम्यान यावेळी अभाविपचे कोकण प्रांत मंत्री अमित ढोमसे, माजी मंत्री प्रेरणा पवार, सहमंत्री नीरज कुरकुटे, यांच्यासह योगेश्वर राज पुरोहित, सूरज लोकरे, शुभम शिंदे, शंकर संकपाळ, प्रणव वांडेकर, ओम मांढरे, धीरज नलावडे, वैष्णव देशमुख यांच्यासह ४० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

" मुळात पेपर फ़ुटलेच नाहीत. शंका व्यक्त होताच परीक्षा रद्द केली. यांना काय जे पेपर फोडणार होते त्यांची काळजी आहे का? ज्या मंत्र्यांनी तीन दिवस मेहनत घेऊन सर्व रॅकेट उघड केले. मग माझ्या बंगल्यावर मोर्चा का काढण्यात येतो. पेपर फोडणाऱ्यांचे आणि यांचे काही लागेबांधे आहेत का, की यातील काही विद्यार्थी यांचेच होते. माझ्या कार्यकर्त्यांनी जे केले ते स्वाभाविक आहे. आपल्या नेत्यांविषयी कार्यकर्त्याला आदर असतो. त्यामुळे आपल्या नेत्यांच्या घरावर कोणी चालून आले तर कार्यकर्ते आक्रमक होणारच. परीक्षा शुल्क परत करण्याबरोबरच विद्यार्थ्यांची माफी मागितली यात आमचं काय चुकले. राजकीय अभिनिवेश आणण्यापेक्षा चर्चा केली असती तर योग्य ठरलं असतं' – डॉ. जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री

"विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या अक्षरशः खेळखंडोबा झाला असून या सरकारला जाग केव्हा येणार. विद्यार्थ्यांचं झालेले नुकसान कसं भरून देणार. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सर्व मंत्री आणि विभागांशी समन्वय करून परीक्षेची यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. नाही तर पुन्हा असे प्रकार घडत जाणार आणि याची सर्व जबाबदारी सरकारवर असेल. याचा जाब विचारल्याशिवाय विद्यार्थी राहणार नाहीत. " – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

चुकीच्या पध्दतीने आंदोलन झाले, त्यांनी आरेला कारे केले तर आम्ही सुध्दा करणार, मंत्रलयात जाऊन निवेदन देणे अपेक्षित होते. परंतु घराबाहेर येऊन आंदोलन करणे अयोग्य आहे. मंत्री आव्हाड यांनी पेपर फुटी प्रकरणी दक्षता घेत, योग्य भुमिका घेतली आहे. त्यामुळे पुन्हा परिक्षा होऊन विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही हे सुध्दा स्पष्ट केले आहे. असे असतांना अशा प्रकारे आंदोलन करणे अयोग्य आहे. – आनंद परांजपे – शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी, ठाणे

हे ही वाचलं का ?

SCROLL FOR NEXT