Latest

Lionel Messi Retirement : मेस्सीच्या निवृत्तीनंतर ‘हे’ पाच खेळाडू होणार भविष्यातील फुटबॉल स्टार!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील दोन महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो आपल्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. कतारमध्ये होणारी फिफा विश्वचषक स्पर्धा ही या दोन खेळाडूंसाठी शेवटची मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे. मेस्सीनेही कतारमध्ये होणारा विश्वचषक आपला शेवटचा असेल असे नुकतेच जाहीर केले आहे. मेस्सी आणि रोनाल्डो यांनी जे स्थान मिळवले आहे त्या स्थानावर पोहोचणे सध्याच्या फुटबॉलपटूंसाठी खूप कठीण असेल. पण असे काही खेळाडू आहेत जे आगामी काळात फुटबॉल स्टार होऊ शकतात. अशाच काही होतकरू खेळाडूंवर एक नजर टाकूया, जे सध्या फुटबॉलच्या मैदानावर दमदार कामगिरी करत आहेत.

1. कीलियन एमबाप्पे (Kylian Mbappe)

फ्रेंच खेळाडू कीलियन एमबाप्पे हा अवघ्या 23 वर्षांचा अहे. त्याचा ट्रॅक रेकॉर्ड अविश्वसनीय आहे. एक खेळाडू म्हणून एमबाप्पेने अनेक पुरस्कार आणि विजेतेपद पटकावले आहेत. सध्या पीएसजी क्लबकडून खेळणारा एमबाप्पे हा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात गोल करणारा सर्वात तरुण फ्रेंच खेळाडू आहे. एमबाप्पेने 2018 च्या विश्वचषक फायनलमध्ये एक गोल नोंदवून पेलेची बरोबरी केली. पेल आणि एमबाप्पे हे एकमेव तरुण फुटबॉलर आहेत ज्यांनी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत गोल केले आहेत.

2. फिल फोडेन (Phil Foden)

22 वर्षीय फिल फोडेनने त्याच्या वयाच्या इतर अनेक खेळाडूंपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळवली आहे. त्याने लीग कप, एफए कप आणि प्रीमियर लीग जिंकले आहेत. मँचेस्टर सिटीचे व्यवस्थापक पेप गार्डिओला यांचा फिल फोडेनवर खूप विश्वास आहे आणि या इंग्लिश खेळाडूच्या प्रतिभेची त्यांना खात्री आहे. विशेष बाब म्हणजे पेप यांनी दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीसोबतही काम केले आहे.

3. व्हिनिसियस ज्युनियर (vinicius junior)

व्हिनिसियस ज्युनियर फक्त 22 वर्षांचा आहे. तो रिअल माद्रिद क्लबकडून खेळतो. अगदी लहानपणापासूनच त्याने फुटबॉल तज्ज्ञांवर खूप प्रभाव पाडला आहे. ब्राझीलसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळणाऱ्या व्हिनिशियस ज्युनियरचे ड्रिब्लिंग कौशल्य खूपच अप्रतिम आहे. आगामी काळात व्हिनिशियस फुटबॉलमध्ये अनेक विक्रम करू शकतो, असे जाणकरांचे मत आहे.

4. बुकायो साका (bukayo saka)

21 वर्षीय बुकायो साका सर्वात प्रतिभावान खेळाडूंमध्ये गणला जातो. आर्सेनलकडून क्लब फुटबॉल खेळणाऱ्या साकाने आपल्या खेळाने अनेक चाहत्यांना प्रभावित केले आहे. युरो 2020 दरम्यान, साकाने त्याच्या कामगिरीने विशेष छाप पाडली. त्या स्पर्धेत साकाने आपल्या कामगिरीने इंग्लंडला प्रथमच स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यास मदत केली.

5. अर्लिंग हॉलंड (erling haaland)

नॉर्वेचा स्टार स्ट्रायकर आर्लिंग हॅलँड इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये मँचेस्टर सिटीकडून खेळतो. चालू प्रीमियर लीग हंगामात 22 वर्षीय हॉलंडने गोलचा पाऊस पडला असून त्याने आतापर्यंत आठ सामन्यांत 14 गोल केले आहेत. हॉलंड या पूर्वी जर्मन फुटबॉल क्लब बोरुसिया डॉर्टमंडकडून खेळला होता जिथे त्याची कामगिरी खूप चांगली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT