पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखले ( Vikram Gokhale ) यांचे गेल्या २६ नोव्हेंबर २०२२ रोजी निधन झाले. प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, शेवटी त्यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. विक्रम गोखले यांनी त्याच्या कार्यकाळात सिनेक्षेत्रात अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे. याच दरम्यान त्यांची एक वेबसीरीज देखील येणार होती. परंतु, अचानक झालेल्या निधनामुळे निर्मात्यांनी ही वेबसीरीज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण निर्मात्यांना विक्रम यांच्याशिवाय वेबसीरीज पूर्ण होऊ शकत नाही, असे वाटत आहे.
'द रायझिंग अँड कोटा' चे दिग्दर्शक संजीव जयस्वाल यांनी अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्या निधनानंतर त्यांची 'आंबेडकर द लिजेंड' ही वेबसीरीज थांबवावी लागणार आहे, असे म्हटले आहे. या वेबसीरीजमध्ये विक्रम गोखले यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या वेबसीरीजच्या दोन भागांचे शूटिंग पार पडले आहे. विक्रम गोखले यांची ही शेवटची वेबसीरीज आहे. त्यांच्या निधनानंतर ही वेबसीरीज बंद करावा लागणार असल्याची शक्यता संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केली आहे.
लखनवी, फरेब आणि अन्वर या चित्रपटांच्या सह-निर्मात्यांनी म्हटले आहे की विक्रम गोखले यांनी या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. या व्यक्तीरेखेसाठी दुसरे तगडे व्यक्तिमत्व मिळणं थोडे कठीण आहे. याशिवाय संजीव जयस्वाल यांनीही त्याच्याशिवाय काम करणे अशक्य आहे किंवा या बेवसीरीजला पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागणार आहे. गेल्या वर्षी मुंबईत यासाठी विक्रमजींनी सुमारे दोन एपिसोडचे शूटिंग पूर्ण केले आहे. उर्वरित शूटिंगसाठी लखनौमध्ये सेट बांधायचा होता. विक्रमजींसोबतचे शेवटचे शूटिंग पुण्यतिथीनिमित्त (६ डिसेंबर) मुंबईत पार पडले होते.
ते पुढे म्हणाले की, 'विक्रम सरांसोबत माझा पहिला प्रोजेक्ट लखनऊमध्ये होता. जिथे ते एका प्रोफेसरची भूमिका साकारणार होते. याच दरम्यान त्याच्या पायाच्या दुखापतीच्या समस्या वाढल्या आणि त्यांनी वेबसीरीजच्या शूटिंगमधून बाहेर पडले. मधल्या काळात त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटासह काही शूट केले. परंतु, तब्येतीमुळे त्यांना जास्त काम न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. या प्रकल्पाबाबत तो खूपच उत्सूक होते. परंतु, ही वेबसारीज अपूर्णच राहणार असे वाटतेय.' संजीव जयस्वाल यांनी याच वर्षी मार्चमध्ये त्याच्याशी शेवटचे बोलणे केलं होते.