Latest

अखेर संजय राऊत मीडियासमोर आले, कुणावरही टीका नाही, फडणवीसांच्या निर्णयाचे केले कौतुक

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पत्राचाळ प्रकरणी तब्बल १०३ दिवस तुरुंगात घालवल्यानंतर ‍शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज गुरुवारी (दि.१०) मीडियासमोर आले. यावेळी त्यांनी कुणावरही टीका केली नाही. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे मात्र कौतुक केले. कारागृहात भिंत्तींशी संवाद साधावा लागतो, एकाकीपणा खायला उठतो, मी ईडी किंवा केंद्रीय यंत्रणांवर टीका करणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. फडणवीसांनी काही निर्णय चांगले घेतले आहेत, त्यांची लवकरच भेट घेणार आहे. शरद पवारांशी फोनवर चर्चा झाली असून आज उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

गरीबांना घरे देण्याच्या फडणवीसांच्या निर्णयाचे स्वागत

काही निर्णय सरकारने चांगले घेतले त्यासाठी त्यांचे स्वागत करतो. राज्यासाठी आणि देशासाठी चांगल्या गोष्टींचे स्वागत केले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी काही निर्णय चांगले घेतले आहेत. त्यांच्याकडून अनेक चांगले निर्णय ऐकायला मिळत आहेत. गरीबांना घरे देण्याचा निर्णय तसेच म्हाडाला अधिकार देण्याचा निर्णय आमच्या सरकारने काढून घेतले होते ते पुन्हा देण्याचा निर्णय फडणवीसांनी घेतला. त्यामुळे सरकारच्या चांगल्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

फडणवीसांसह मोदी, शहांची भेट घेणार

राज्याचा कारभार उपमुख्यंत्री चालवत आहेत. ते अनुभवी नेते आहेत. माझे सरकारी काम त्यांच्या विभागाशी येते. त्यामुळे दोन तीन दिवसांत उपमुख्यंत्री फडणवीस यांना भेटणार आहे. मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा नसतो. तो राज्याचा असतो. तसे पंतप्रधान हा देशाचा असतो. मी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेणार आहे. भेट घेणार म्हणून नरमाईची भूमिका घेतली असं नाही.

राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर

१०३ दिवसांचा अनुभव इतक्या लवकर सांगण्यासारखा नाही, असे म्हणत खासदार राऊत यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी एका भाषणामध्ये सागितले होते की, संजय राऊतांना लवकरच अटक होणार आहे आणि त्यांनी एकांतात राहण्याची प्रॅक्टिस करावी. मला त्यांना सांगायच आहे की, ईडीने केलेली अटक बेकायदेशीर होती, असे न्यायालयाचे मत आहे. राजकारणामध्ये शत्रूच्या संदर्भात तुरूंगात जाण्याच्या भावना व्यक्त करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

अमित शहांकडे मांडणार कैफियत!

कालच्या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. त्यांना माझ्याबाबत काय झाले, याची माहिती देणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. जेव्हा तुरूंगात होतो तेव्हा फडणवीस यांनी महाराष्ट्रात कटुता वाढली आहे, ती कमी करण्याची गरज असल्याचे बोलले होते. त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

संजय राऊतांची अटक बेकायदेशीर; विशेष न्यायालयाने 'ईडी'ला फटकारले

गोरेगाव पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष 'पीएमएलए' न्यायालयाने बुधवारी व्यक्तिगत जामीन मंजूर केला. राऊत यांची अटक बेकायदेशीर आहे, 'ईडी'ने आपल्या मर्जीने आरोपी निवडले आणि आत टाकले, अशा शब्दांत विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी 'ईडी'वर कडक ताशेरे ओढले. राऊत यांची सुटका रोखण्याचा प्रयत्न मात्र 'ईडी'ने अखेरपर्यंत सुरू ठेवला. या जामिनाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी निर्णयाला स्थगिती देण्याची 'ईडी'ची विनंती न्या. देशपांडे यांनी फेटाळून लावली. नंतर उच्च न्यायालयानेही स्थगिती देण्यास नकार दिल्याने 'ईडी'ला दुहेरी दणका बसला.

गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प घोटाळ्यात गेल्या 31 जुलै रोजी अटक झाल्यापासून संजय राऊत आर्थर रोड कारागृहात होते. 'पीएमएलए' न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर राऊत यांच्या जामीन अर्जावर दोन्ही पक्षांकडून प्रदीर्घ युक्तिवाद झाला. लेखी उत्तरे सादर झाली. महिनाभर ही सुनावणी चालली आणि गेल्या 2 नोव्हेंबरला न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. तो बुधवारी (दि. 9) जाहीर केला. सुमारे 170 पानांच्या निकालपत्रात न्यायालयाने 70 पाने केवळ संजय राऊत यांच्याविषयीचा निर्णय देत 'ईडी'वर कडक ताशेरे ओढले आणि राऊत यांना जामीन मंजूर केला.

पत्राचाळ घोटाळ्यातील मुख्य आरोपी वाधवान पिता-पुत्रांना 'ईडी'ने आजवर अटक केली नाही. त्यांना मोकाट सोडले. 'म्हाडा'चे अधिकारीही या घोटाळ्यात गुंतलेले असताना त्यातील कुणालाही आरोपी केलेले नाही. प्रवीण राऊत यांना दिवाणी खटल्यात अटक केली आणि संजय राऊत यांना तर विनाकारण आत टाकले, अशा शब्दांत न्या. देशपांडे यांनी 'ईडी'च्या कारवाईचे वाभाडे काढले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT