Latest

कोल्हापूर : हुपरीत जलाभिषेक करुन पाळक पाळत मेघराजाला घातले साकडे

मोनिका क्षीरसागर

हुपरी; पुढारी वृत्तसेवा : मेघराजाच्या आराधनेसाठी हुपरी शहरात गेली पाच मंगळवार पाळक पाळण्यात आला. ग्रामीण भागातील परंपरा आजही हुपरी शहराने अखंडित सुरू ठेवली आहे. आज पाळक पाळत, शेवटच्या मंगळवारी श्री टोळ बिरदेव मंदिरात जलाभिषेक करुन मेघराजाला पावसासाठी पुन्हा साकडे घालण्यात आले.

हुपरीमध्ये मेघराजाच्या आराधनेसाठी गेली ५ मंगळवार पाळक म्हणून पाळण्यात आले होते. यादरम्यान शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. आज ग्रामस्थांकडून पहाटे ४ वाजता पारकट्टा अष्टविनायक गणेश मंदिर ते पंचगंगा नदीपर्यंत चालत जाऊन ग्रामस्थांनी स्नान केले. नदीतील पाणी घेऊन येत, गावातील सर्व देवदेवतांना जलाभिषेक घालण्यात आला. टोळ बिरोबाला जलाभिषेक घालून ५ मंगळवार पाळकाची यावेळी सांगता करण्यात आली.

या प्रथेत युवक व भक्त पंचगंगा नदीवर पायी चालत जाऊन पाणी आणतात आणि ग्रामदैवत  श्री अंबाबाई मातेसह गावातील सर्व देवतांना अभिषेक करतात. महिनाभर पाळण्यात आलेल्या पाळकाची ग्रामस्थांच्या उपस्थित आज सांगता करण्यात आली. ग्रामदैवत अंबाबाई मंदिर, टोळ बिरदेव मंदिर येथे जलाभिषेक करण्यात आला. यावेळी पाऊस पडू दे, सृष्टी हिरवीगार होऊ दे, सर्व जिवांना दिलासा मिळू दे, सर्वजण सुखी संपन्न होऊ देत, अशी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. आजच्या शेवटच्या पाळक असल्याने भक्त  शेतकरी, कष्टकरी, कामगार, उद्योजक उत्साहाने यामध्ये सहभागी झाले होते.

SCROLL FOR NEXT