Latest

पंढरपूर : आषाढीचा सोहळा अनुभवून भाविक परतीच्या प्रवासाला!

दिनेश चोरगे

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : 

जातो माघारी पंढरीनाथा ।
तुझे दर्शन झाले आता ॥

अशा तृप्त भावनेने आषाढी यात्रा एकादशीचा सोहळा साजरा करून वारकरी तीर्थक्षेत्र पंढरीतून शुक्रवारी परतीच्या प्रवासाला लागले. आषाढी सोहळ्यासाठी यंदा तब्बल 15 लाखांहून अधिक संख्येने भाविक आले होते. एसटी बस, रेल्वे व खासगी वाहनांचा आधार परत जाण्यासाठी भाविक घेत आहेत. दरम्यान, मानाच्या पालख्या पौर्णिमेपर्यंत पंढरीत मुक्कामी असणार आहेत. गोपाळकाला करूनच या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. आषाढी यात्रेसाठी दशमी, एकादशी व व्दादशी असे तीन दिवस पंढरपूर येथे वास्तव्यास असलेल्या भाविकांनी एकादशी साजरी करून व्दादशीला परतीचा प्रवास सुरू केला आहे. बहुतांश भाविक स्वत:च्या वाहनाने तसेच एसटी बसेस व रेल्वेने प्रवास करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

खासगी वाहनांसाठी प्रशासनाने शहर व परिसरात 18 ठिकाणी पार्किंग व्यवस्था केलेली आहे. भाविकांची संख्या 15 लाखांपेक्षा जास्त असल्यामुळे वाहनांची संख्या देखील वाढलेली आहे. त्यामुळे परतीच्या प्रवासाला वाहने बाहेर पडत असताना रस्त्यावर गर्दी होत असून, वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसून येते. तात्पुरती बसस्थानके शहराबाहेर असल्यामुळे तेथे जाण्यासाठी भाविक रिक्षांचा आधार घेत आहेत. रिक्षांमुळे देखील वाहतूक कोंडी होताना दिसत आहे.

जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली असली तरी यंदा जादा संख्येने भाविक आले आहेत. या भाविकांनी उन्हातान्हाचा विचार न करता दर्शन रांगतेून दर्शन घेण्यास तसेच मुखदर्शन घेण्यावर भर दिला. 65 एकर येथील भक्तीसागर, रेल्वे मैदान, उपनगरीय भागात तंबू, राहुट्या उभारून भाविक विसावले होते. सोलापूर जिल्ह्यातील भाविक एकादशी दिवशीच माघारी परतले आहेत. राज्यभरातून आलेले भाविक व्दादशीला माघारी परतू लागले आहेत.

SCROLL FOR NEXT