Latest

एका मिनिटात 68 नारळ फोडण्याचा विक्रम

अनुराधा कोरवी

नवी दिल्ली ः जगभरात अनेक प्रकारचे विश्वविक्रम होत असतात. काही भारतीयांनी असे वेगवेगळे विक्रम करून गिनीज बुकमध्ये नाव नोंदवलेले आहे. त्यापैकीच एक विक्रमवीर म्हणजे व्ही. सैदलवी. मार्शल आर्ट शिकलेल्या या व्यक्तीने नानचाकूचा वापर करुन एका मिनिटात तब्बल 68 नारळ फोडले आहेत. या व्यक्तीने नारळ फोडले तर खरं, पण ते काही लोकांच्या डोक्यावर ठेवून फोडले, जे पाहायलाही फार भयानक वाटतं. हा पराक्रम करुन त्यांनी जागतिक विक्रम रचला. या अनोख्या कामगिरीबद्दल या व्यक्तीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंद करण्यात आलेली आहे.

मार्शल आर्टिस्ट व्ही. सैदलवी यांनी एका मिनिटात एक-एक करून हे 68 नारळ फोडले होते. सैदलवी हे कर्नाटकातील मद्दूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सैदलवी यांनी हे नारळ काही लोकांच्या डोक्यावर ठेवले होते, जे नानचाकूच्या मदतीने फोडायचे होते. सैदलवीने हे 68 नारळ फोडून स्वतःचाच विक्रम मोडला! या वर्षाच्या सुरुवातीला सैदलवीने इटलीतील एका टॅलेंट शोमध्ये 42 नारळ फोडले होते, तर यावेळी त्याने 68 नारळ फोडून आपलाच विक्रम मागे टाकला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्ने त्यांच्या एक्स म्हणजेच टि्वटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केलेला आहे, ज्यात सैदलवी हे नारळ फोडताना दिसत आहेत.

व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे, 6 जण काळ्या रंगाचा टी-शर्ट घालून खाली बसले आहेत, ज्यांच्या डोक्यावर नारळ ठेवण्यात आला आहे. या मुलांच्या मधोमध सैदलवी नानचाकू घेऊन उभे आहेत. एका कार्यक्रमात सैदलवी यांनी भाग घेतला होता. जेव्हा 'गो' म्हटले जाते, तेव्हा सैदलवी एक-एक करून सर्व नारळ नानचाकूच्या सहाय्याने फोडायला लागतात. प्रत्येक तरुणाच्या डोक्यावर ठेवलेला नारळ जेव्हा सैदलवी फोडतात तेव्हा तरुण लगेच दुसरा नारळ डोक्यावर ठेवतात. सैदलवी यांनी एका मिनिटात असे 68 नारळ फोडले. ज्यावेळी सैदलवी नारळ फोडत होते, त्यावेळी अनेक दर्शक तिथे उपस्थित होते आणि सर्वजण आश्चर्याने हा पराक्रम पाहत होते. सैदलवी हे मूळचे कर्नाटकचे राहणारे आहेत. त्यांनी हा रेकॉर्ड करताना कुणालाही इजा पोहोचणार नाही याची काळजी घेतली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT