Latest

मृत्यूच्या 27 मिनिटांनंतर ‘ती’ पुन्हा झाली जिवंत!

Arun Patil

मिशिगन : एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर काय होते? हा प्रश्न असा आहे, जो आपल्यातील अनेकांनी मागील कित्येक वर्षांत सातत्याने उपस्थित केला आहे. या प्रश्नावरून अभ्यासकांची, तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. याचवेळी काही लोक मृत पावल्यानंतर काय होते, त्याबाबत आपल्याला जे काही अनुभव आले, त्यावरूनही बरेच काही सांगत असतात. आपण असे अनेक लोक पाहतो, जे काही काळ मृतवत असताना काही वेळेनंतर पुन्हा जिवंत होतात आणि या दोन स्थितीमधील अनुभूती नेमकी काय होती, ते नंतर शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतात. टीना हाईन्स ही देखील त्यापैकीच एक आहे.

लॅडबायबलने दिलेल्या वृत्तानुसार, टीना हाईन्सची ही कहाणी अर्थातच हैराण करणारी आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये टीनाची तब्येत खूपच बिघडली होती. तिला वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते. वास्तविक, त्या आजारातून तिची बचावण्याची शक्यता खूपच कमी होती, पण तरीही तिचे पती ब्रायन यांनी अगदी पाण्यासारखे पैसे खर्च करताना तिच्यासाठी जे काही शक्य आहे, ते सारे करण्याचा प्रयत्न केला.

एक दिवस तर असा आला की, काही मिनिटांसाठी ती गतप्राण होते. सारी हालचाल थांबते. श्वास थांबतो. आता सारे काही संपले, असेच चित्र असते. पण, मृत्यूच्या 27 मिनिटांनंतर जणू चमत्कारच घडतो आणि टीना पुन्हा एकदा डोळे उघडते. यादरम्यात ती कागद पेन मागून घेते आणि आपण त्या 27 मिनिटात काय अनुभवले, हे त्या कागदावर उतरवते. ती म्हणते, ते खूप वास्तविक होते. रंग अतिशय जिवंत होते. मी एक आकृती पाहिली. पण, यासारखे अनुभव इतके दुर्मीळ नाहीत.

अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांशी लोकांना त्या काही मिनिटात काय घडले, हे मुळात कळत नाही. अगदी 10 ते 20 टक्के लोकच अशा घटना लक्षात ठेवू शकतात. पण, मृत्यू जवळ असताना काय होते, याचा उलगडा करण्याच्या अभ्यासात बरीच प्रगती आहे. मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी 2013 मध्ये काही उंदरांवर अभ्यास केला. त्यांच्या अहवालानुसार, मृत्यू पूर्वी मेंदूतील जागृत अवस्था, चेतन अवस्था अन्य अवस्थांच्या तुलनेत अधिक प्रभावी असते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT