Latest

पुणे: विजयरणस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

अमृता चौगुले

कोरेगाव भीमा, पुढारी वृत्तसेवा: पेरणे (ता. हवेली) येथील विजयरणस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. त्या अनुषंगाने समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी शनिवारी(दि. ३१) कार्यक्रमस्थळाची पाहणी करून कोविड-१९ च्या संबंधित सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी बार्टीचे महासंचालक धम्मजोती गजभिये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणाची तयारी पूर्ण झाली आहे. कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गृह विभागाने विविध सूचना निर्गमित केल्या असल्याने येणाऱ्या सर्व अनुयायांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

या सोहळ्यादरम्यान १ जानेवारी रोजी पहाटे धम्मयाचना, सकाळी भारतीय बौद्ध महासभा यांच्याकडून सामुदायिक बुद्ध वंदना करण्यात येणार आहे. तसेच मान्यवरांकडून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर समता सैनिक दल, महार बटालियन सेवानिवृत्त सैनिक यांच्याकडून सलामी व मानवंदना हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ८ नंतर अभिवादन स्थळ सर्व अनुयायांना अभिवादनाकरिता खुले असणार आहे. या कार्यक्रमाचे सकाळी ६ पासून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दिवसभर थेट प्रसारण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी शासनाने समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय समिती गठित केली आहे. या समितीचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख हे अध्यक्ष आहेत. तर समाज कल्याणचे पुणे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी हे समितीचे सदस्य सचिव आहेत.

अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या महिलांची संख्या विचारात घेता लहान बाळांच्या स्तनपानासाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विजयरणस्तंभ ते पार्किंगचे ठिकाण हे अंतर जास्त असल्याने कोणत्याही अनुयायाला काही त्रास झाल्यास किंवा दुखापत झाल्यास तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 'आरोग्य दूत' ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली आहे. येणाऱ्या अनुयायांची गर्दी विचारात घेता दुचाकीवरील आरोग्य दूत तात्काळ आरोग्य सेवा देतील.

फोटो ओळ : सजावट करण्यात आलेला विजयरणस्तंभ. (छाया : शंकर पाबळे)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT