Latest

पार्कर सोलर प्रोब नव्या वर्षात करणार वेगाचा विक्रम

Arun Patil

वॉशिंग्टन : भारताने लाँच केलेले 'आदित्य एल-1' हे यान लवकरच पृथ्वी आणि सूर्यादरम्यानच्या 'एल-1' पॉईंटवर पोहोचत आहे. तेथून ते सूर्याचे निरीक्षण करून त्याबाबतचा डेटा संशोधकांना पाठवत राहील. 'नासा'नेही यापूर्वी सूर्याकडे 'पार्कर सोलर प्रोब' हे यान पाठवलेले आहे. आणखी एक वर्षाने म्हणजे 24 डिसेंबर 2024 रोजी हे यान 195 किलोमीटर प्रतिसेकंद म्हणजेच ताशी 7 लाख किलोमीटर इतक्या अफाट वेगाने सूर्याजवळून जाईल. माणसाने बनवलेली कोणतीही वस्तू आजपर्यंत इतक्या वेगाने गेलेली नाही. तसेच सूर्याच्या इतक्या जवळ जाणारीही ही पहिलीच मानवनिर्मित वस्तू आहे. सध्या पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या पृष्ठभागापासून 61 लाख किलोमीटर अंतरावर आहे.

या प्रोजेक्टचे वैज्ञानिक डॉ. नूर राउफी यांनी सांगितले की आपण जवळजवळ सूर्यावर उतरतच आहोत अशी ही स्थिती आहे. 1969 मध्ये माणसाचे चांद्रभूमीवर पहिले पाऊल पडले होते. त्या यशाइतकेच हे मोठे यश आहे. पार्करचा हा वेग सूर्याच्या अत्याधिक गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण होणार आहे. हा वेग इतका अधिक असेल की या वेगाने पृथ्वीवर प्रवास केला तर केवळ 30 सेकंदांमध्ये न्यूयॉर्क ते लंडन म्हणजेच अमेरिका ते इंग्लंडचा प्रवास पूर्ण होईल. अमेरिकन स्पेस एजन्सी 'नासा'चे ही आतापर्यंतची सर्वात धाडस मोहीम आहे.

2018 मध्ये सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी हे यान लाँच करण्यात आले होते. या यानाचे उद्दिष्ट्य अनेकवेळा सूर्याजवळून जाणे हे आहे. 2024 मध्ये हे यान सूर्याच्या इतके जवळ जाईल की सूर्य व पृथ्वीदरम्यानच्या अंतराच्या केवळ 4 टक्के अंतर उरेल. अर्थात पार्करसमोर हा वेग गाठण्यात अनेक आव्हाने आहेत. सूर्याच्या जवळ गेल्यावर त्याचे तापमान सुमारे 1400 अंश सेल्सिअसपर्यंत होईल. या मिशनची रणनीती लवकरात लवकर आत जाऊन लगेच बाहेर येणे हे आहे.

सूर्याच्या उष्णतेची झळ या यानाला बसणार नाही. याचे कारण म्हणजे त्याच्यावर उष्णतारोधक असे जाड शिल्ड बसवलेले आहे. या जाड शिल्डखालीच यानाची सर्व उपकरणे आहेत. त्यांच्या सहाय्याने सौर पर्यावरणाची नोंद केली जाते. या मोहिमेतून काही प्रमुख सौर प्रक्रियांची महत्त्वाची माहिती मिळू शकते. त्यामध्ये प्रामुख्याने सूर्याच्या बाह्य वातावरणाच्या म्हणजेच कोरोनाच्या माहितीचा समावेश आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 6 हजार अंश सेल्सिअस असते. मात्र, कोरोनाचे तापमान लाखो अंश सेल्सिअस असते. कोरोना सूर्यापासून बराच वर असतो. हे सूर्याचे वरच्या स्तरातील वातावरण आहे असे म्हटले तरी चालते. त्याचे तापमान प्रत्यक्ष सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा इतके अधिक का असते हे आतापर्यंत न उलगडलेले कोडे आहे. ते या मोहिमेमधून उलगडले जाईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT