Latest

संशोधन : आदित्याय नमः

Arun Patil

'इस्रो'ने हाती घेतलेल्या 'आदित्य एल-1' मिशनला अलीकडेच मोठे यश लाभले. सूर्याचे भवितव्य काय आहे? पृथ्वीवरील तापमान सूर्य वाढविणार की कमी करणार? सौरचक्र बदलत असताना असे अनेक प्रश्न शास्त्रज्ञांचे कुतूहल वाढवीत आहेत. हे कुतूहल शमवण्याचे काम 'आदित्य' मिशन करणार आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच 'एक्स्पोसॅट'चे यशस्वी प्रक्षेपण करून नवा इतिहास रचणार्‍या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) आणखी एक मोठे यश आले आहे. देशाच्या पहिल्या सौर मोहिमेतील 'आदित्य एल-1' उपग्रहाने सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षण समतोल बिंदूंपैकी एक बिंदू 'लँगरेंज पॉईंट -1' (एल-1) वर यशस्वीरीत्या पोहोचण्याचा विक्रम केला आहे. पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर सूर्याच्या दिशेने हे यान 110 दिवसांनी पोहोचले आहे. 'आदित्य एल-1' ही सौर वेधशाळा असून, ती सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणार आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर 2 सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून सुरू झालेला सूर्याच्या दिशेने 15 लाख किलोमीटरचा प्रवास निर्धारित स्थानावर पोहोचला आहे. भारतीय अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या शास्त्रज्ञांच्या कर्तृत्वाची साक्ष नव्याने यानिमित्ताने जगाला पटली आहे. अत्यंत क्लिष्ट आणि वेधक अंतराळ मोहिमा साकारण्याचे उद्दिष्ट समोर ठेवणे आणि अथक समर्पणभावाने त्या यशस्वी करणे, ही 'इस्रो'च्या संशोधकांची ओळख झाली आहे.

विश्वात अनंत तार्‍यांमध्ये सूर्य हा सर्वात जवळचा तारा. यावर अनेक उलथापालथ होत असतात. त्यातल्या काहींमध्ये वारंवारता दिसून येते. सूर्य समजला की विश्वातील तारे व त्यांचा अभ्यास करणे सुलभ होते. सूर्यावर सौरडागांची संख्या व त्यामधील वारंवारतेचा गेल्या तीन शतकांपासून दररोज अभ्यास केला जात आहे. प्राचीन साहित्यामध्ये तेजःपुंज म्हणून उल्लेखला गेलेला सूर्य हा महाकाय ऊर्जेचा स्रोत आहे. सूर्याच्या तापमानाचा विचार केल्यास दहा हजार फॅरनहाईट (5500 अंश सेल्सियस) आहे. या ठिकाणी उर्त्सजित होणार्‍या न्यूक्लिअर रिअ‍ॅक्शन्समुळे सूर्यमंडळाचे तापमान सात दशलक्ष फॅरेनहाईट किंवा 15 दशलक्ष सेल्सिअसपर्यंत पोहोचते. 'नासा'च्या मते, शंभर अब्ज टन डायनामाईटच्या स्फोटानंतर निर्माण होणारी उष्णता ही सूर्याच्या तापमानाएवढी आहे. सूर्यामधून प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर पडत असते. त्याचबरोबर सौरज्वालाही बाहेर पडत असतात. त्या ज्वालांची दिशा पृथ्वीकडे वळली तर अंतराळ यान, उपग्रह आणि संपर्क यंत्रणा खराब होऊ शकते. 'आदित्य एल-1' अशा सोलर इव्हेंट्सची वेळेवर माहिती देईल, जेणेकरून नुकसान कमी करता येईल.

प्रत्येक ग्रहाजवळ असे काही पॉईंट असतात, जेथे त्या ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती, अवकाशयानाची कक्षीय गती आणि सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती यांचे संतुलन साधले जाते. त्या ठिकाणी अवकाशयान स्थिर करून तेथून सूर्याची निरीक्षणे नोंदवणे, अभ्यास करणे शक्य असते. पृथ्वी आणि सूर्य यांच्यादरम्यान असे पाच पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत. त्यांना लँगरेंज पॉईंट 1 ते 5 अशी नावे देण्यात आली आहेत. त्यापैकी एल-1 या पॉईंटपर्यंत आदित्य यान जाणार आहे. तेथून ते निरीक्षणे नोंदवेल. लँगरेंज पॉईंट हे नाव इटालियन संशोधक जोसेफ लुई लँगरेंज यांच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे. 'आदित्य'ने हा एल-1 पॉईंट गाठला आहे.

आता हॅलो ऑर्बिटपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. ही एल-1 ची अशी एक अशी कक्षा आहे, जिथे उपग्रह आणि अवकाशयान स्थिर राहून कार्य करू शकतात. जर हे वाहन या कक्षेत पोहोचले नाही, तर ते सूर्याकडे प्रवास करत राहील आणि नंतर त्यात विलीन होईल. हॅलो ऑर्बिटमधून 'आदित्य' वेगवेगळ्या कोनातून सूर्याचा अभ्यास करू शकणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथे ग्रहणाचा अडथळा येणार नाही. कारण पृथ्वी ज्याप्रमाणे सूर्याभोवती फिरते, त्याचप्रमाणे ही कक्षा एल-1 बिंदूभोवती फिरते.

आतापर्यंत 'इस्रो' जमिनीवर आधारित दुर्बिणीद्वारे सूर्याचा अभ्यास करत असे; परंतु यामुळे सूर्याचे वातावरण सखोलपणे दिसून येण्यास मर्यादा येत होत्या. विशेषतः सूर्याचा बाहेरचा थर, कोरोना इतका धगधगता का आहे आणि त्याचे तापमान नेमके किती आहे, हे माहीत नाही; पण 'आदित्य'सोबत गेलेली उपकरणे यावर प्रकाश टाकणार आहेत. यापैकी व्हीईएलसी ही एक दुर्बीण आहे, जी 24 तास सूर्याच्या कोरोनावर लक्ष ठेवेल आणि दररोज 1,440 छायाचित्रे पाठवेल. सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप सूर्याच्या फोटोस्फियर आणि क्रोमोस्फियरच्या प्रतिमा घेईल. सोलेक्स आणि हिलियस ही उपकरणे सूर्याच्या क्ष-किरणांचा अभ्यास करतील. आस्पेक्स आणि प्लाझ्मा विश्लेषक सौर वादळांचा अभ्यास करून त्यांची ऊर्जा किती आहे, हे समजावून सांगतील. मग्नेटोमीटरद्वारे एल-1 बिंदूभोवतीच्या चुंबकीय क्षेत्राची गणना केली जाईल. 'आदित्य एल-1'वरून सूर्याची पहिली प्रतिमा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळण्याची शक्यता आहे.

पहिल्याच सौरमोहिमेत भारताने सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी वेधशाळा स्थापन केली आहे. पृथ्वीपासून सुमारे पंधरा लाख किलोमीटर अंतरावर 'आदित्य'ने आपले ध्येय यशस्वीपणे गाठणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. सूर्याच्या कक्षेत गेलेल्या या यानाचे एकूण वजन हे 1475 किलोग्रॅम एवढे आहे. यावर जी सात उपकरणे बसवली आहेत, त्यांचे वजन हे 244 किलोग्रॅम एवढे आहे. 'आदित्य एल-1'मध्ये विशेष यंत्रणा तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे कोणत्याही परिस्थितीत यान सूर्याच्या कक्षात टिकू शकेल. सूर्य हा एक तारा आहे. त्यामुळे सूर्यावर सतत उद्रेक होत असतात. कोणत्याही स्फोटाचे कोणतेही परिणाम या यानावर होणार नाहीत. या मोहिमेचा खर्च हा जवळपास 378 कोटींपर्यंत असणार आहे. भारतीय शास्त्रज्ञांचे विशेष कौतुक होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अत्यंत कमी खर्चात ही मोहीम पार पडणार आहे. भारत विज्ञानाच्या सीमा विस्तारत असून, त्याचा लाभ येणार्‍या काळात संपूर्ण जगाला होणार आहे. या अत्यंत आव्हानात्मक मिशनचे सर्व घटक सुरळीतपणे कार्यरत असल्याचे प्रारंभिक संकेत दर्शवताहेत. 'आदित्य' पुढील पाच वर्षे संशोधन आणि संशोधनाच्या माध्यमातून मानवतेच्या कल्याणासाठी नवीन माहिती गोळा करणार आहे.

आतापर्यंत हेलिओज-1 हे यान सूर्यापासून 29 दशलक्ष मैल म्हणजेच 47 दशलक्ष किलोमीटर अंतरावर पोहोचले होते. हे यान डिसेंबर 1974 मध्ये पाठविण्यात आले होते. हेलिओज-2 हे दुसरे यान एप्रिल 1976 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते आणि सूर्यापासून 1.8 दशलक्ष मैल म्हणजेच तीन दशलक्ष किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचण्यात या यानाला यश आले होते. ऑगस्ट 2004 मध्ये 'मेसेंजर' हे यान बुध ग्रहाच्या दिशेने पाठविण्यात आले होते. सूर्यापासून हा ग्रह 36 दशलक्ष मैल म्हणजे 58 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. 'नासा'च्या 'पार्कर सोलर प्रोब' या यानाने सूर्याच्या वातावरणात प्रवेश केला होता. हे यश आणि त्यासंदर्भातील प्रारंभिक निरीक्षणांची घोषणा 14 डिसेंबर रोजी अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स येथे करण्यात आली. 'नासा'ची ही मोहीम 2018 मध्ये सुरू झाली होती.

सूर्याबाबतची अनेक रहस्ये विज्ञानाने उकलली आहेत, हे खरे असले तरी गेल्या 9000 वर्षांत सूर्य आणि अन्य काही तार्‍यांपासून निघणारी ऊर्जा आणि प्रकाश खरोखर फिका पडला आहे का, हा खरा प्रश्न आहे. सूर्याचे भवितव्य काय आहे? पृथ्वीवरील तापमान सूर्य वाढविणार की कमी करणार? सौरचक्र बदलत असताना असे अनेक प्रश्न शास्त्रज्ञांचे कुतूहल वाढवीत आहेत. हे कुतूहल शमवण्याचे काम 'आदित्य' मिशन करणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT