Latest

महुआ मोईत्रा यांच्यावरील अपात्र कारवाईनंतर अधीर रंजन चौधरी यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

backup backup

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : 'कॅश फॉर क्वेरी'  प्रकरणात तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोईत्रा यांना अपात्र ठरविण्याच्या लोकसभेच्या नैतिक आचरण विषयक समितीच्या (एथिक्स कमिटी) प्रस्तावित शिफारसीला लोकसभेतील कॉंग्रेसचे गटनेते आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. अशा प्रकारे अपात्र ठरविणे ही अतिशय गंभीर शिक्षा आहे, असेही या पत्रात अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे.

एथिक्स कमिटीने महुआ मोईत्रा यांची कॅश फॉर क्वेरी प्रकरणात चौकशी पूर्ण केल्यानंतर तयार केलेला अहवाल व शिफारसी सोमवारी (४ डिसेंबर) संसद अधिवेशनादरम्यान लोकसभेत मांडल्या जाणार आहेत. यात समितीने महुआ मोईत्रा यांना अपात्र ठरविण्याची शिफारस केल्याचे सांगितले जात आहे. मात्र या कारवाईला तृणमूल कॉंग्रेसने आधीच विरोध केला असून सभागृहात अहवालावर चर्चा व्हावी त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जावा, असा पवित्रा या पक्षाचा आहे. आता कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनीही मोईत्रा यांची पाठराखण केली आहे. अर्थात, ही आपली व्यक्तिगत भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कॉंग्रेस गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभाध्यक्षांना पाठविलेल्या पत्रात लोकसभा सदस्यांचे हक्क आणि अधिकार तसेच संसदीय समित्यांच्या कामकाजाशी संबंधित नियम आणि कार्यपद्धतीचा आढावा घेण्याची सुचना केली आहे. या चारपानी पत्रात चौधरी यांनी हक्कभंग कारवाई समिती आणि नैतिक आचरण विषयक समिती यांच्या भूमिकांमध्ये सदस्यांना शिक्षा देण्याच्या अधिकारांचा समावेश नसल्याचा दावा केला आहे. तसेच समितीच्या कार्यपद्धतीवर राजकीय भूमिकांचा देखील प्रभाव पडत असल्याने लोकसभाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली कार्यपद्धतीमध्ये सुसुत्रता आणण्याची आवश्यकता असल्याचे देखील अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे.

….

SCROLL FOR NEXT