Latest

पुणे : मुलांवर अ‍ॅडिनो व्हायरसचे संकट! ताप, सर्दी, उलटी, जुलाबाची लक्षणे

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोनानंतर आता पुन्हा व्हायरल इन्फेक्शनचे संकट घोंघावू लागले आहे. प्रौढांमध्ये इन्फ्लूएंझा व्हायरसचा एच3एन2 आणि लहान मुलांमध्ये अ‍ॅडिनो व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. ताप, सर्दी, उलटी, जुलाब, घसा खवखवणे, डोळे लाल होणे अशी लक्षणे मुलांमध्ये दिसत आहेत. महापालिकेने सर्व खासगी रुग्णालयांना उपचारांबाबत सूचना दिल्या आहेत.

अ‍ॅडिनो व्हायरच्या संसर्गामुळे मुलांच्या श्वसन नलिका, आतडे, डोळे तसेच मूत्रमार्ग बाधित होत असल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदवले आहे. यासह सर्दी, न्यूमोनिया आणि पचनाचे आजार, मूत्रमार्गाचाही त्रास होऊ शकतो. मुलांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असेल तर त्यांची विशेष काळजी घ्या, असेही मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

उपचारांबाबत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणार
राज्याचे आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला अ‍ॅडिनो व्हायरसबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्याचे पत्र नुकतेच पाठवले होते. संशयित रुग्ण आढळल्यास उपचारांबाबत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणार असल्याचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.

नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह
शहरात अद्याप अ‍ॅडिनो व्हायरसचा एकही रुग्ण आढळलेला नाही. सिंहगड रस्त्यावरील खासगी रुग्णालयात काही संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र, नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे आजारी मुलांचे उपचार, लक्षणे आदींबाबत सर्वेक्षण करण्याच्या सूचना खासगी दवाखान्यांना देण्यात आल्या आहेत.

SCROLL FOR NEXT