Latest

आदमापूर बाळूमामा भंडारा उत्‍सवात भाकणूक : ‘महाराष्‍ट्रात सत्‍तेचे सिंहासन डळमळत राहील; छोटे पक्ष आघाडी घेतील’

निलेश पोतदार

मुदाळतिट्टा ; प्रा.शाम पाटील  भारत-पाकिस्तान छूपे युद्ध सुरूच राहील. भारतीय सैनिक छातीचा कोट करून भारत मातेचे रक्षण करतील. भारत देश पाकिस्तानचा चौथाई कोना ताब्यात घेईल. चीन भारतावर आक्रमण करेल. भारतीय सैनिक चीनचा हल्ला परतवून लावण्यात यशस्वी होतील. जगातील अनेक राष्ट्र एकमेकांशी लढतील. एकमेकांचे भाग काबीज करतील. जगात तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल. तिरंगा झेंडा आनंदात राहील. जगातील अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील. अशी भविष्यवाणी कृष्णा बाबुराव डोणे पुजारी (वाघापूर कर) यांनी केली. श्रीक्षेत्र आदमापुर ता. भुदरगड येथील बाळूमामा भंडारा यात्रा प्रसंगी भाकणूक कार्यक्रमात त्‍यांनी ही भविष्यवाणी केली.

मराठी वर्षातील ही शेवटची भाकणूक असल्यामुळे आगामी वर्षात काय होणार याचा सूचक इशारा या ठिकाणी मिळत असल्याने साऱ्याचे लक्ष या भाकणुकीकडे लागून राहते. बाळूमामा देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थित लाखो भाविकांच्या समोर ही भाकणूक आज रविवारी दि.19 मार्च रोजी पहाटे संपन्न झाली

कृष्णात डोणे पुजारी यांनी केलेली भविष्यवाणी अशी… 

कोरोनापेक्षा मोठी महामारी येईल. माणसाला अठरा तर्हेचा एक आजार होईल. कालवा कालव होईल. जगावर आजारांची संकट येतच राहतील. आजारावर औषध मिळणार नाहीत. डाॅक्टर लोक हात टेकतील. कोरोनाच संकट कमी जास्त होईल. कलियुगात मनुष्याला अल्प आयुष्य लाभेल.

भारत-पाकिस्तान संघर्ष सुरु राहील, दोघांत छुपे युद्ध होईल. भारतीय सैनिक पाकिस्तानवर ताबा मिळवतील एक चौथाई हिस्सा ताब्यात घेतील. अतिरेकी घुसखोरी करतील. मोठे बाॅंम्ब स्फोट करतील. घोटाळा होईल. मोठी शहरे उध्वस्त होतील. माणुस माणसाला खाईल. कापाकापी होईल. दिवसा ढवळ्या दरोडेखोरांकडून लुटमार होईल.

राजकीय नेते कोलांट उड्या मारतील. सत्ता संपत्तीच्या मागे धावतील. सत्तेच्या बाजारात राजकीय नेता विकत मिळेल. पैसा न खाणारा राजकीय नेता शोधून सापडणार नाही. राजकारणात मोठा गोंधळ होईल. राज दरबारी मोठा दंगा धोपा होईल. राजकीय नेते मोठ्या घोटाळ्यात अडकून पडतील. तुरुंगात जातील. 2023 सालात राजकीय नेते उड्डाण मारतील.

महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ निर्माण होईल. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचा सिंहासन डळमळत राहील. महाराष्ट्रात छोटे पक्ष राजकारणात आघाडी घेतली  राजकारणात उलथापालत होईल.

साखरेचा भाव तेजी मंदीत राहील. गुळाचा भाव उच्चांकी राहील. साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील. मॅनेजर आनंदी राहील. उसाचा दर चार हजारांवर जाईल. उसाचा पाऊस होऊन रस्त्यावर पडेल. उसाच्या कांड्यांचा दुधाच्या भांड्यानं राज्या-राज्यात गोंधळ निर्माण होईल. व्यापारी वर्ग शेतकऱ्याची मोठी लुबाडणूक करेल. शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण होईल.

सीमा भागातले राजकारण ढवळून जाईल. निपाणी भागात मोठा गोंधळ होईल. सिमा प्रश्न निकालात निघेल. मेघराजा काळतंत्र सोडेल. बारा महिने पाऊस होईल. जलप्रलय होतील. कर्नाटक राज्याच्या जलाशयाला मोठी भगदाड पडतील. भाग जलमय होईल.

दिड महिन्यात धान्य उदंड पिकेल. खरीप पीक चांगले होईल. गोर गरीबाला पुरावा करील‌. तांबडी रास मध्यम पिकेल. पांढर धान्य उदंड पिकेल. गव्हाची शेती मध्यम पिकेल. ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. वैरण सोन्याची होईल सांभाळुन ठेवा. वैरण – धान्याच्या मोठ्या प्रमाणात चोरी होतील. सरकी फुकाची होईल. बैलाची किंमत बकऱ्याला येईल. बकऱ्याचा भाव लाखांवर जाईल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. धनगराच बाळ मेंढी म्हणुन अस्वलाला मिठी मारेल.

न्याय देवता विकत मिळेल. पैशाच्या जोरावर न्याय मिळेल. वाड्या वस्त्या ओसाड पडतील. जंगलातील पक्षी गावात येईल. मनुष्य जंगलात जाईल. उन्हाळ्याचा पावसाळा होईल. ऋतुमान बदलत जाईल. घरातुन गेलेला मनुष्य परत घरी येईल सांगता येत नाही. दागिणे पैसे माणसाला घातक ठरतील. रेल्वेचे मोठे अपघात होतील. विज्ञानाची प्रगती माणसाला घातक ठरेल. बुद्धी जास्त आयुष्य कमी होईल.
महागाईचा भस्मासूर वाढेल, सामान्य लोकांना जगणं मुश्किल होईल, पेट्रोल इंधन गॅस दरवाढीने जनता हैराण होईल, जागतिक बाजारपेठेत मंदी येईल, तरुण वर्ग बेरोजगारीच्या खाईत लोटेल. ठेचेला मरण हाय. मनुष्याच जगंण धर्माचे, मरण हुकमाचे ठरेल. कलियुगात मनुष्याला कमी आयुष्य लाभेल. लहानचा मोठा होईल, मोठ्याचा लहान होईल.

आदमापुरच्या बाळूमामांचा त्रिभुवनाथ जयजयकार होईल. बाळुमामाचा महिमा साऱ्या जगात वाढेल. जगाच्या कल्याणासाठी बाळूमामाचा अवतार आहे. आदमापूरचे तीर्थक्षेत्र पंढरपूर होईल. बाळूमामांचा राजवाडा पाहण्यासाठी जग दुनियातून लोक येतील पिवळ्या भस्माचा महिमा वाढत जाईल.

SCROLL FOR NEXT