Latest

जगातील एक तृतीयांश जनतेवर तीव्र खाद्य संकट; संयुक्त राष्ट्र संघाचा अहवाल

करण शिंदे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जगातील एक तृतीयांश जनता खाद्यान्न संकटाला सामोरे जात असल्याची धक्कादायक माहिती संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक अहवालातून पुढे आली आहे. नुकताच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार २०२३ मध्ये २८१.६ दशलक्ष लोकांना खाद्यान्न संकटाला सामोरे जावे लागले होते. सध्या ५९ देश खाद्यान्न संकटाचा सामना करीत आहेत. या संकटासाठी हवामान, स्थलांतर आणि युद्ध या गोष्टी जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

खाद्यान्न संकटामागे हवामान हे प्रमुख कारण असून १८ देशांमध्ये प्रतिकूल हवामानामुळे ही गंभीर स्थिती ओढवली आहे. त्यामध्ये जवळपास ७२ दशलक्ष लोकांना फटका बसला आहे. अलनीनोच्या प्रभावामुळे अनेक देशांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली होती. परिणामी उत्पादन घटले असून लोकांना खायला अन्न मिळत नसल्याची वास्तविकता अहवालातून समोर आली आहे. खाद्यान्न तुटवड्यासाठी मोठ्याप्रमाणात होत असलेले लोकांचे स्थलांतर आणि युद्धजन्य परिस्थिती ही कारणे प्रमुख आहेत.

संयुक्त राष्ट्राच्या या अहवालानुसार सुदान आणि गाझापट्टीत खाद्यान्न संकटाचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. युद्धामुळे विस्थापनाची स्थिती निर्माण झाली आहे. सुदानमधील एक तृतीयांश लोकांना आपत्कालीन खाद्यान्न पुरवठा करण्याची गरज आहे. आफ्रिकी देशात गेल्या एक वर्षापासून सुरू झालेला सशस्त्र संघर्षाचा वनवा आता दक्षिण-पूर्व देशांमध्ये पोहोचला आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, प्रत्येक पाच माणसामागे एकाला खाद्यान्न उपलब्ध देण्याची आवश्यकता आहे.

भूक आणि कुपोषणाचा सर्वाधिक परिणाम महिला आणि बालकांवर झाल्याचे दिसून आले आहे. जगातील ३६ देश दीर्घकालीन खाद्यान्न संकटाला सामोरे जात आहेत. २०२२ आणि २०२३ या वर्षांची तुलना केल्यास १७ देशांमधील खाद्यान्न स्थिती सुधारली आहे. या देशांतील ७.२ दशलक्ष लोकांना तीव्र खाद्य असुरक्षेला सामोरे जावे लागल्याचे अहवालात म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT