Latest

अभिनेत्री ईश्‍वरी देशपांडे हिचा भावी पतीसह गोव्यात अपघाती मृत्यू

Arun Patil

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : नवोदित मराठी अभिनेत्री ईश्‍वरी देशपांडे (वय 25) आणि तिचा होणारा पती शुभम देडगे (28) यांचा गोवा येथील कार अपघातात मृत्यू झाला. सोमवारी पहाटे हडफडे-म्हापसा येथे बागा खाडीत कार बुडाल्याने ही दुर्घटना घडली.

पुण्याची रहिवासी असलेली अभिनेत्री ईश्‍वरी देशपांडे हिने 'प्रेमाचे साईड इफेक्टस्' या आपल्या पहिल्यावहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. त्याचबरोबर एका हिंदी चित्रपटाचेही चित्रीकरण तिने पार पाडले होते.

गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्‍वरी आणि शुभम बागा येथून म्हापशाच्या दिशेने जात होते. साकवाडी-हडफडे येथे पार्क रिओ हॉटेलजवळ पोहोचले असता, शुभम याचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्त्यालगतच्या एका झाडाला धडकली.

त्यामुळे कारवरील नियंत्रण गेले व कार सुमारे 70 मीटर विरुद्ध दिशेने जाऊन रस्त्याशेजारील खाडीत उलटली. शुभम आणि ईश्‍वरी यांनी मदतीसाठी 'आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा' अशी आर्त हाक दिली. मात्र, लोक घरातून मदतीसाठी बाहेर धावण्यापूर्वीच कार खाडीत बुडाली.

या घटनेची माहिती पिळर्ण अग्‍निशमन दलाला मिळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, जवानांनाही संबंधितांना वाचविता आले नाही. अपघातग्रस्त कारच्या काचा आतून बंद असल्याने शुभम आणि ईश्‍वरी यांना कारमधून बाहेर पडता आले नाही त्यामुळे त्यांचा आतमध्ये बुडून मृत्यू झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT