पुढारी ऑऩलाईन डेस्क : एका अभिनेत्यासाठी स्वतःला स्क्रीनवर सादर करण्यायोग्य बनवण्यामागे प्रचंड मेहनत असते. जितकी मेहनत कलाकाराला कलेवर घ्यावी लागते तितकीच मेहनत एका भूमिकेच्या लुकसाठी ही घ्यावी लागते. (Prasad Jawade) झी मराठीवर 'पारू' ह्या मालिकेत आदित्य किर्लोस्कराची भूमिका साकारत असलेल्या प्रसाद जवादेने आदित्यच्या लुकसाठी घेतलेल्या मेहनतीच्या प्रवास शेअर केला. (Prasad Jawade)
माझ्या जीवनशैली मध्ये पहिले काही वेळापत्रक नव्हतं, जसा दिवस जायचा तसा मी जागायचो तेव्हाच मला कळलं की हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पण एक वर्षापूर्वीपासून काही सवयी बदलल्या, वेळेत खाणं, झोपणं आणि व्यायाम करणं ही शिस्त स्वतःला लावली आणि आता जेव्हा स्वतःला स्क्रीन किंवा आरशात पाहतो तेव्हा खूप बरं वाटतं. मी फिट राहण्यासाठी वेळेत खाणं आणि झोपणं या गोष्टी पाळायचा प्रयत्न करतो. या सगळ्याचा फायदा मला पारू या मालिकेसाठी झाला. दिवसात ४ लिटर पाणी पितोच. माझी २ लिटर ची खास पाण्याची बॉटल आहे. जेवण पण प्रमाणात घेतो, अति खाणं पोटाला चांगलं नसतं. मी नियमांनी गोष्टी पाळायला लागलो तेव्हा पासून मला माझ्यात फरक जाणवू लागला. जेव्हा तुम्हाला आतून छान वाटतं तेव्हा तुमचं आरोग्य ही उत्तम राहतं.
मी रोज जीमला जाऊ शकत नाही, पण मी घरी ऑनलाईन व्यायाम करतो. माझा ट्रेनर मला ऑनलाईन मदत करतो. कधी वेळा जुळून आल्या नाहीतर मी अर्धा-पाऊण तास धावायला जातो, सूर्य नमस्कार घालतो, डिप्स मारतो, त्यासोबत मी प्राणायाम करतो. काहीही झालं तरी आठवड्यातून ४ दिवस हे वेळापत्रक पाळतोच. मी माझं २८ किलो वजन कमी केलेय.
खाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी पूर्ण आहार घेतो जसं की वरण, भात, भाजी, पोळी. जेवणात फक्त एक गोष्ट पाळतो ती म्हणजे गोडावर नियंत्रण. मला तसं ही गोड जास्त आवडत नाही. या सगळ्या मेहनतीचं फळ मला तेव्हा दिसलं जेव्हा मी आदित्य किर्लोस्करच्या भूमिकेत हेलिकॉप्टरचा प्रोमो शॉट पाहिला आणि मनाला जो आनंद मिळाला त्यांनी मी फिट राहण्यासाठी अजून प्रवृत्त झालोय.
एक सल्ला मला सर्वांना आवर्जून द्यायला आवडेल, जो मी माझ्या आईलाही देतो की तुम्हाला व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर दिवसातून एकदा तरी चालायला जा, त्याने शरीरातल्या व्याधी दूर व्हायला मदत होईल. 'पारू' सोमवार ते शनिवार संध्या ७:३० वा झी मराठीवर पाहता येईल.