पुढारी ऑनलाईन डेस्क : Actor Michael Gambon : हॉलिवूडची सर्वात मोठी फिल्म फ्रँचायझी हॅरी पॉटरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. या चित्रपटांमध्ये प्रोफेसर डंबलडोरची भूमिका साकारणारे अभिनेते मायकल गॅम्बोन (Actor Michael Gambon) यांचे निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. मायकेल यांची पत्नी लेडी गॅम्बन आणि त्यांचा मुलगा फर्गस यांनी या वृत्ताला दुजोरा देणारे निवेदन जारी केले आहे. 'सर मायकल गॅम्बन यांच्या निधनाची घोषणा करताना आम्हाला अतिशय दुःख होत आहे. ते एक प्रेमळ पती आणि वडील होते,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
अभिनेता मायकेल गॅम्बोन (Actor Michael Gambon) यांच्या मॅनेजरने एक निवेदन जारी केले. यामध्ये लेडी आणि फर्गस यांच्या वतीने म्हटलंय की, 'सर मायकल गॅम्बोन यांचे निधन झाले आहे. हे वृत्त सांगताना आम्हाला खूप वेदना होत आहेत. मायकेल, एक प्रेमळ वडील आणि पती होते. हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आम्ही सर्वांना विनंती करतो की या वेदनादायक काळात आमची प्रायव्हसी जपू द्या.'
मायकेल गॅम्बोन (Actor Michael Gambon) यांना प्रेमाने 'द ग्रेट गॅम्बोन' म्हटले जायचे. अभिनेते राल्फ रिचर्डसन यांनी त्यांना हे नाव दिले होते. हॉलिवूड चित्रपटांपूर्वी मायकेल गॅम्बन नाटकांमध्ये काम करायचे. त्यांच्या विविध नाटकांमधील भूमिका गाजल्या. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. मायकेल यांनी वयाच्या 15 व्या वर्षी शालेय शिक्षण सोडले. सहकलाकारांप्रमाणे त्यांनी कोणत्याही नाटक शाळेत प्रशिक्षण घेतले नाही. सुरुवातीच्या दिवसांत ते छोटी-मोठी कामे करत असत. येथूनच त्यांनी अभिनय शिकला आणि आपल्यातील कलागुणांना वाव दिला.
गॅम्बोन (Actor Michael Gambon) यांचा जन्म 1940 मध्ये आयर्लंडच्या डब्लिन येथे झाला. दुस-या महायुद्धाच्या काळात त्यांचे वडील कुटुंबासह लंडनला आले आणि येथे त्यांना पोलिस म्हणून नोकरी मिळाली. वयाच्या 16 व्या वर्षी मायकेल गॅम्बोन हे विकर्स आर्मस्ट्राँग कारखान्यात काम करू लागले. याचदरम्यान त्यांनी सेट बिल्डर म्हणून त्यांनी थिएटरमध्ये काम करायला सुरुवात केली. यानंतर त्यांना रंगमंचावर छोट्या-छोट्या भूमिका मिळू लागल्या. 1965 मध्ये आलेल्या 'ऑथेलो' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांना चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका मिळू लागल्या.
1989 मध्ये आलेल्या द कुक, द थीफ, हिज वाईफ अँड हर लव्हर या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. याशिवाय त्यांनी द सिंगिंग डिटेक्टिव्ह आणि एंजल्स इन अमेरिका या चित्रपटातही काम केले. पण 2004 मध्ये आलेल्या हॅरी पॉटर अँड द प्रिझनर ऑफ अझकाबन या चित्रपटाने त्यांना प्रोफेसर डंबलडोर म्हणून जगभर प्रसिद्धी दिली. तेव्हापासून मायकेल प्रोफेसर डंबलडोर म्हणून ओळखले जाऊ लागले. 2019 मध्ये कॉर्डेलिया हा त्याचा शेवटचा चित्रपट होता.