पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बंध रेशमाचे', 'छोटी मालकीण', 'स्वाभिमान' या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला प्रेक्षकांचा लाडका अभिनेता अक्षर कोठारी लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २० नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या नव्या मालिकेत अक्षर अद्वैत चांदेकर ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.
अद्वैत हा बिझनेस मॅन आहे. वडिलोपार्जित चालत आलेल्या सोनं, चांदी आणि हिऱ्यांचा बिजनेस तो एकटा सांभाळतो. बिझनेसशी निगडित असलेली प्रत्येक गोष्ट तो खूप प्रामाणिकपणे करतो. तो जे पारखून घेईल त्यात चूक शोधूनही सापडणार नाही. असे मालिकेत दाखविण्यात आलं आहे.
हे नवं पात्र साकारण्यासाठी अक्षर फारच उत्सुक आहे. अद्वैत चांदेकर या व्यक्तिरेखेविषयी सांगताना तो म्हणाला की, 'स्टार प्रवाहसोबत माझं जुनं नातं आहे. या कुटुंबाचा भाग असल्याने मला आनंद आहे. दिवाळीच्या धामधुमीत माझी 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' ही नवी मालिका भेटीला येतेय. 'स्वाभिमान' मालिका संपल्यानंतर नवीन काय अशी सातत्याने विचारणा होत होती. लक्ष्मीच्या पाऊलांनीच्या निमित्ताने नवं पात्र साकारायला मिळत आहे. इशा केसकरसोबत पहिल्यांदाच काम करतोय. भेटताक्षणीच आमची छान मैत्री झाली. याआधीच्या मालिकांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. हेच प्रेम नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे.' अशी भावना अक्षर कोठारीने व्यक्त केली. यामुळे मालिकेसाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.