औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा
औरंगाबादेतील लेबर कॉलनी येथे मोडकळीस आलेल्या घरांवर कारवाई सुरू आहे. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे, आज पहाटेपासूनच ही कारवाई सुरू करण्यात आली. दरम्यान, काँग्रेसचे नेते चंद्रभान पारखे दोन तासांपासून घरातून बाहेर निघण्यास तयार नव्हते. ते निवासस्थानाचा ताबा सोडण्यास तयार नव्हते. म्हणून अखेर पोलिसांनी त्यांना उचलून रुग्णवाहिकेत टाकून घाटी रुग्णालयात नेले.
शहरातील लेबर कॉलनी भागातील सरकारी वीस एकर जागा ताब्यात घेण्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलिसांनी बुधवारी (दि. ११) भल्या पहाटे कारवाई सुरू केली. प्रचंड पोलीस बंदोबस्त, जेसीबीचा ताफा, अधिकारी- कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. दुपारपर्यंत ३३८ घरांचा सफाया होण्याची शक्यता आहे.
शासकीय वसाहत असलेल्या लेबर काँलनी भाग रिकामा करण्यावरून चाळीस वर्षांपासून वाद होता. प्रशासनाने ८ नोव्हेंबर २०२१ रोजी लेबर कॉलनीतील जागा ताब्यात घेण्यासाठी तयारी केली होती. परंतु न्यायालयीन प्रक्रिया आणि तेथील मुळ रहिवाशांची बाजू ऐकण्यासाठी आजवरचा कालावधी गेला. दरम्यान नागरिकांना घरे रिकामे करण्यासाठी बुधवारपर्यंत वेळ देण्यात आला होता. त्यानुसार पहाटे पाच वाजेपासून अधिकारी- कर्मचाऱ्यांचा ताफा लेबर काँलनी भागात दाखल झाला. त्यापुर्वीच बहुतांश रहिवाशांनी घरे रिकामी केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते.
कारवाईला सुरुवात होताच एका कुटुंबाने समोर येत पुनर्वसन करण्याची मागणी केली. आश्वासन देत प्रशासनाने त्यांची बोळवण केली. दरम्यान कारवाईला सुरुवात करण्यात आली. कारवाई सुरू झाल्यानंतर काही रहिवाशांना संसार उपयोगी साहित्य घराबाहेर काढले. त्यामुळे प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला. काँग्रेसचे नेते चंद्रभान पारखे दोन तासापासून घरातून बाहेर निघण्यास निवासस्थानाचा ताबा सोडण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांनी त्यांना उचलून रुग्णवाहिकेत टाकून घाटी रुग्णालयात नेले. एका वृद्ध महिलेला देखील रुग्णालयात हलविण्यात आले.
शहरातील बहुचर्चित लेबर कॉलनीतील जीर्ण शासकीय निवासस्थानावर बुधवारी पहाटे ६.३८ वाजण्याच्या सुमारास बुलडोझर चालविण्यास सुरुवात झाली. ४० घरे पाडल्यानंतर पथक काँग्रेसचे स्थानिक नेते चंद्रभान पारखे यांच्या घरासमोर दाखल झाले. परंतु त्यांनी पथकास विरोध केला. दोन तास समजूत काढल्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशाने पारखे यांना उचलून रुग्णवाहिकेत टाकून घाटी रुग्णालयात रवाना करीत पाडापाडीला सुरुवात करण्यात आली.
उन्हामुळे पहाटेपासूनच मोहीम सुरू केली. या परिसरात ३३८ सदनिका आहेत. कारवाई सुरू झाल्यानंतर एका रहिवासीने प्रशासनाला किरकोळ विरोध केला. परंतु पोलिसांनी या कुटुंबास घरातून बाहेर काढून कारवाईला सुरुवात केली. ४० हून अधिक घरे भुईसपाट केल्यानंतर पारखे यांच्या घरासमोर पथक पोहोचले. जिल्हाधिकारी चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडये यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेते पारखे यांची समजूत काढली. मात्र दोन तासानंतरही ते घरातून निघण्यास तयार झाले नाही. अखेर पोलिसांनी त्यांना उचलून रुग्णवाहिकेत टाकून घाटी रुग्णालयात नेले. घरातील सामान सरकारी वाहनातून हलविण्यात आले.