Latest

बुलेटराजा कायद्याच्या कचाट्यात ! पुणे जिल्ह्यात १३ पोलिस ठाण्यांकडून बुलेटराजांवर कारवाई

अमृता चौगुले

बारामती (पुणे) : पुढारी वृत्तसेवा :  येथील अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे यांच्या आदेशानंतर जिल्ह्यातील १३ पोलिस ठाण्यातील वाहतूक अधिकारी-कर्मचाऱयांनी बुलेटचा सायलेन्सर बदलून ध्वनीप्रदूषण करणा-या ८६ जणांवर कारवाई केली आहे. या कारवाईत ८६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. बुलेट मोटारसायकलीला कंपनीने दिलेले मूळ सायलेन्सर बदलून फटाके फोडणारे किंवा ध्वनीप्रदूषण करणारे सायलेन्सर बसविण्याचे फॅड अलिकडील काळात वाढीस लागले आहे.

अशा बुलेट जवळून गेल्यानंतर नागरिकांना त्याच्या आवाजाचा मोठा त्रास सहन करावा लागतो. दुसरीकडे ध्वनी प्रदूषण होत असते. ही बाब टाळण्यासाठी बारामती परिमंडळ हद्दीत दोन दिवस कारवाईची मोहिम राबविण्यात आली. त्यात ८६ बुलेटचालकांवर वाहनात बदल केल्याने मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करत ८६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहनाच्या मूळ रचनेत बदल करणे हा दंडनिय अपराध आहे. बुलेटमध्ये सायलेन्सर बदलून फटफट आवाज करणारे सायलेन्सर लावले असल्यास संबंधित वाहन मालकांनी ते आठ दिवसात बदलून घ्यावेत. त्यानंतर अशी वाहने आढळून आल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा भोईटे यांनी दिला आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर अधिक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलिस ठाण्यांच्या वाहतूक शाखेकडून करण्यात आली.

पोलिस ठाणे निहाय झालेली बुलेट वाहनावर कारवाई
बारामती शहर- १८, बारामती तालुका- १५, वालचंदनगर -११, यवत – १०, इंदापूर- ७, राजगड-७, माळेगाव-५, जेजुरी- ५, वडगाव निंबाळकर – ४, सासवड- २, भिगवण–२, दौंड-२, भोर-२

SCROLL FOR NEXT