पुढारी ऑनलाईन डेस्क : लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबधीत एका शूटरचा सख्खा भाऊ पोलिस चकमकीत ठार झाला आहे. पानिपत जिल्ह्यातील समलखा येथे शुक्रवारी रात्री 9 वाजता ही घटना घडली. राकेश उर्फ राका (सिसाना गाव, जि. सोनीपत, हरियाणा) असे चकमकीत ठार झालेल्याचे नाव असून तो सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी प्रियव्रत फौजी याचा धाकटा भाऊ आहे.
एसपी अजित सिंह शेखावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पानिपतच्या समलखा भागातील नरैना रोडवर पोलिसांनी एका कारचा पाठलाग सुरू केला. त्या कारमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबधीत राकेश उर्फ राका आणि त्याचा साथीदार होता. फिल्मी स्टाईलने चाललेल्या थरारक प्रसंगी पोलिसांनी दोघांना आत्मसर्पण करण्याचे आवाहन केले. मात्र राका आणि त्याच्या साथीदाराने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनाही गोळीबार करावा लागला. यात धोडपूर गावाजवळ राकेश उर्फ राका हा चकमकीत ठार झाला. तर त्याचा साथीदार सोनू उर्फ प्रवीण (रा. सिद्धार्थ नगर) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर पानिपतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर राकेश उर्फ राकू याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून शवागारात ठेवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येतील आरोपी प्रियव्रत उर्फ फौजी याचा राकेश उर्फ राकू हा धाकटा भाऊ आहे. दोघेही लॉरेन्स बिश्नोई टोळीचे संबधीत आहेत. राकेश उर्फ राका हा पानिपत आणि कुरुक्षेत्रातील खंडणीच्या दोन प्रकरणांमध्ये आरोपी होता. तर कुरुक्षेत्रातील संजय बुरा यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी प्रियव्रत फौजी हा सध्या सीआयएच्या कोठडीत आहे. याआधीही त्याच्याविरुद्ध पंजाब आणि हरियाणामध्ये अनेक गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्रियव्रत उर्फ फौजी हा आधी सैन्यात नोकरीला होता. त्याने 2015 मध्ये नोकरी सोडली. यानंतर त्याचे नाव एका खुनाच्या प्रकरणात आले. तुरुंगातून जामीन मिळाल्यानंतर तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमध्ये सामील झाला. त्यानंतर 29 मे 2022 रोजी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर त्यांचे नाव चर्चेत आले. सध्या तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. गेल्या महिन्यातच त्याने तुरुंगातूनच पानिपत येथील डेअरी संचालकाकडून 50 लाखांची खंडणी मागितल्याचा त्याच्यावर आरोप आहे.