आपल्या हाती अचानक मोठी रक्कम पडली तर आनंदाला पारावर राहणार नाही. परंतु ही गोष्ट खरी आहे की, आपल्या हाती लवकरच एखादी रक्कम पडणार आहे. अर्थात यासाठीदेखील नियम व अटी लागू आहेत. ज्या खात्यात दहा वर्षांपेक्षा अधिक काळात व्यवहार झालेला नाही, अशा खातेधारकांना पडून असलेली रक्कम मिळणार आहे.
आपलीही काही खाती असतील, दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून व्यवहार झालेला नसेल, काही रक्कम सोडून दिली असेल आणि खाते बंद केलेले नसेल, तर त्या खात्याची रक्कम आपल्याला मिळणार आहे.
प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यांवर वेगवेगमळ्या बँकेत खाते सुरू करतो आणि काही कालावधी गेल्यानंतर एखाद्या कारणाने नव्या बँकेत पुन्हा खाते सुरू उघडतो. अशा वेळी जुन्या खात्यातील व्यवहार बंद पडतात. बँकदेखील एक-दोन वर्षांसाठी ग्राहकांच्या खात्याची काळजी घेते. काही काळ त्या उर्वरित रकमेवर व्याजदेखील जमा करत राहते. पण कालांतराने कोणतेच व्यवहार होत नसल्याचे पाहून, त्या खात्याला 'डेड अकाऊंट' श्रेणीत सामील केले जाते. त्यावर व्याजदेखील दिले जात नाही. अशी अनेक खाती वर्षानुवर्षे बंद पडलेली राहतात. खातेधारकही ते खाते विसरून जातात. सरकारने आता अशा बँक खात्यांतील रक्कम ही मूळ मालकाला म्हणजे खातेधारकाला परत देण्याबाबत हालचाल सुरू केली आहे. यानुसार व्यावसायिक बँकांनी 10.24 कोटी खात्यांत पडून असलेले 35 हजार कोटी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे जमा केले आहेत आणि त्याचा कोणीही दावेदार नाही.
आरबीआय पोर्टल करणार : या पोर्टलवर बँकेचे नाव, खातेधारकाचे नाव, खाते क्रमांक आणि अन्य विवरण उपलब्ध करून दिले जाईल. आपल्याकडे अनेक जुनी खाती असतील, तर त्या खात्याची माहिती पोर्टलवरून मिळवू शकता. त्याचबरोबर खात्यात पडून असलेली रक्कमदेखील किती आहे, याची पडताळणी करू शकता. यासाठी खातेधारकांना आपल्या बँकेचे नाव, खाते क्रमांक लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या माध्यमातून खात्यात किती शिल्लक आहे, हे समजू शकते. आपल्याला रक्कम काढायची असे, तर जुन्या बँकेच्या शाखेत जाऊन केवायसी कागदपत्रांसह खात्यात पडून असलेली रक्कम परत मिळवून घेण्यासाठी अर्ज करू शकतो.
खातेधारकाचा मृत्यू झाल्यास : एखाद्या खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्यावर नॉमिनीचा अधिकार राहील. नॉमिनीकडे खातेधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र आणि स्वत:चे तसेच खातेधारकाचे केवायसी कागदपत्र असणे गरजेचे आहे. ही कागदपत्रे घेऊन बँकेशी संपर्क करावा. खात्यात पडून असलेली संपूर्ण रक्कम परत मिळविण्यासाठी औपचारिकता पूर्ण करावी.
संयुक्त खात्यासाठी काय नियम : दोन किंवा तीन व्यक्तींनी एकत्र येऊन संयुक्त खाते सुरू केले असेल आणि त्यात कोणत्याच प्रकारचे व्यवहार होत नसतील, तसेच एक किंवा दोन्ही खातेधारकांचा मृत्यू झाला असेल, तर जोडीदाराने किंवा वारसदाराने केवायसी कागदपत्रांसह बँकेशी संपर्क करायला हवा. संयुक्त खाते असलेल्या सर्वांचे निधन झाले असेल तर नॉमिनीला ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
पोर्टलवर दहा वर्षांपूर्वीच्या खात्याचे विवरण: आरबीआयकडून केंद्रीयकृत पोर्टलवर दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक जुन्या खात्याचे विवरण उपलब्ध करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या खात्यात दहा वर्षांत कोणतेही व्यवहार झालेले नसावेत. तसेच हे खाते निष्क्रिय खात्यांच्या श्रेणीत समाविष्ट केलेले असावे.
शेअरमध्ये पडून असलेल्या रकमेचे काय होणार : म्युच्युअल फंड, विमा, शेअर किंवा लाभांशाची रक्कम घेण्यास काही जण विसरून जातात. तसेच एखाद्या कारणाने त्यांना पाठविलेला धनादेश हा परत येतो, तेव्हा अशा रकमेचे खरे दावेदार असलेल्या मालकापर्यंत ते पैसे पोहचविण्यासाठी अर्थ मंत्रालय तयारी करत आहे. यासाठी सरकार वेगळे पोर्टल तयार करणार आहे. या माध्यमातून जुन्या गुंतवणुकीची माहिती मिळवून त्यात पडून असलेली रक्कम मिळविण्याचा प्रयत्न करता येईल.
नॉमिनी नसेल तर : नॉमिनी नसलेले खाते बँकेला मिळत असेल, तर अशा वेळी संबंधित विभाग निश्चित प्रक्रियेनुसार काम करेल. अर्थात ती रक्कम खातेधारक किंवा कायदेशीर वारसाला सोपविली जाईल.
सध्या कोणती व्यवस्था : दहा वर्षांपासून कोणताही व्यवहार नसल्यास आणि खात्यातील रक्कम ही 'डोरमंट अकाऊंट'मध्ये ट्रान्सफर केली जाते. परंतु डोरमंट खात्यातून पैसे काढणे बरेच कठीण काम आहे आणि यासाठी त्या रकमेचे वास्तविक दावेदार आपणच आहोत, हे सिद्ध करून द्यावे लागेल. आजमितीला सर्व बँका निष्क्रिय खात्यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देत आहेत. आपले खाते निष्क्रिय खात्यात असल्याचे निदर्शनास आले तर बँकेत जाऊन या रकमेवर दावा करू शकतोे. बँकेकडून आपल्याला क्लेमचा अर्ज दिला जाईल. केवायसीच्या कागदपत्रांसह तो अर्ज बँकेत जमा करावा लागेल. लक्षात ठेवा, केवायसीच्या रूपात दिल्या जाणार्या माहितीच्या आधारे आपणच खातेधारकांचे खरे वारसदार, नॉमिनी आहोत, हे सिद्ध होते.
जून महिन्यापासून पैसे मिळणार : आरबीआयकडून बँकेच्या निष्क्रिय खात्यांत पडून असलेली रक्कम परत करण्यासाठी एक जूनपासून '100 डेज पेज' अभियान सुरू करण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक जिल्ह्यात शंभर दिवसांच्या आत बँका 'टॉप 100 अनक्लेम्ड डिपॉझिट्स' हे त्याच्या वास्तविक दावेदारास सुपूर्द करणार आहे.
विधिषा देशपांडे