Latest

हर्निया कसा टाळाल? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

दिनेश चोरगे

हर्नियाचा त्रास दहापैकी एका व्यक्तीला होत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं निरीक्षण आहे. आपल्या पोटातील स्नायू जेव्हा कमजोर बनतात आणि सततच्या खोकल्यामुळे किंवा लघवी व बद्धकोष्ठतेमुळे जोर करावा लागल्यामुळे हर्निया होतो. हर्निया होतो, म्हणजे आपल्या शरीरातील नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रांतून एखादा अवयव, इंद्रिय किंवा त्या अवयवाचा भाग बाहेर येतो.

पोटातील स्नायूंवर येणार्‍या ताणांशी निगडित आजारासाठी 'हर्निया' असा शब्द वापरतात. त्यात पोटाच्या अनेक स्थिती समाविष्ट असतात. पण, बर्‍याचदा हर्नियाची सुरुवात ही मांडीतील स्नायूंच्या अतिरिक्तवाढीने होते.

मांडी आणि पोटाच्या मधील भागात हर्निया विकसित होतो. सामान्यपणे हर्निया याच प्रकारातील होतो. काही काळाने वैद्यकीय उपचारांशिवाय पर्याय नसतो. कारण काही वेळा हा जीवावर बेतण्याची शक्यता असते. औषधांचा उपयोग न झाल्यास शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय राहात नाही. अर्थात, ही शस्त्रक्रिया सोपी असते त्यातून बरे होण्यासही फार कालावधी लागत नाही. अतिताणाचे व्यायाम, वयानुसार स्नायू कमजोर होणे, नितंबाच्या सांध्याची सतत हालचाल, हर्नियाचा पूर्वेतिहास किंवा आनुवंशिकता या कारणांमुळे साधारणपणे हर्निया होऊ शकतो.

लक्षणे

मांडी आणि पोट यांच्यामध्ये फुगा येणे, हा फुगा दुखणे किंवा ओढल्यासारखा वाटणे, व्यक्तीला खोकला आला, ताण आला, खाली वाकताना, उभे राहताना वेदना होतात. पोट जड झाल्यासारखे वाटणे पुरुषांमध्ये, टेस्टिकल्सजवळ वेदना किंवा सूज येते काही वेळा आतडे अंडकोषात ढकलले जाते. काही वेळा हर्निया पुन्हा पोटात जाऊ शकत नाही आणि रक्त पुरवठा थांबतो; पण अशा घटना दुर्मीळ आहेत.

हर्निया कसा टाळाल?

आपल्या उंची आणि शरीरबांध्यानुसार वजन नियंत्रणात ठेवा. अवजड वस्तू उचलताना आपले गुडघे वाकवून दोन पायांवर बसून उचला त्यामुळे ताण येणार नाही. तंतुमय पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करा, त्यामुळे बद्धकोष्ठता होणार नाही. सततच्या बद्धकोष्ठतेमुळे आतड्यांवर ताण येतो आणि हर्निया होण्याची शक्यताही वाढते. वरील सर्वसाधारण गोष्टी लक्षात ठेवल्यास हर्नियाचा धोका टाळता येईल.
लक्षात ठेवा, हर्नियाकडे दुर्लक्ष केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. अचानक आतडे अडकल्यामुळे जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. तसेच अचानक मोठ्या झालेल्या हर्नियामुळे त्यात अडकलेल्या आतड्याचं गँगरिनही होऊ शकतं.

SCROLL FOR NEXT