Latest

पुणे: सहायक पोलिस निरीक्षकास लाच घेताना पकडले; रांजणगाव पोलिस ठाण्यातील घटना

अमृता चौगुले

रांजणगाव गणपती : रांजणगाव गणपती परिसरातील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात ठेकेदाराचे नियमित काम चालू राहावे व थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक देविदास हिरामण कारंडे याने दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. ती देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या.

रांजणगाव एमआयडीसीमधील अनेक कारखान्यात स्थानिक युवक ठेकेदार म्हणून काम करतात. मात्र, अनेकदा कारखान्यांकडून पैसे मिळायला उशीर होतो. त्यामुळे पोलिसांकडून कारखान्याच्या अधिकार्‍यांवर दबाव आणला जातो. एका तक्रारदाराकडे सहायक पोलिस निरीक्षक कारंडे याने लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

तक्रारदार यांचे रांजणगांव येथील एका कंपनीकडे कंत्राट आहे. कंपनीकडील थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी व कंपनीशी पुढील करार चालू ठेवण्याच्या अनुषंगाने तक्रारदार यांच्याविरुद्ध कारवाई न करण्यासाठी कारंडे याने तक्रारदाराकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रांजणगाव पोलिस ठाण्यात सापळा रचून कारंडे यांना ताब्यात घेतले. याबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे युनिटचे पोलिस निरीक्षक विरनाथ माने तपास करीत आहेत, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त श्रीहरी पाटील यांनी दिली.

SCROLL FOR NEXT