Latest

KAWACH : रेल्वेला मिळणार सुरक्षा ‘कवच’; जाणून घ्या काय आहे ही यंत्रणा?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात रेल्वे आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्वाची घोषणा केली आहे. रेल्वे सुरक्षेसाठी 'कवच' (KAWACH) हे स्वदेशी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. या 'कवच' अंतर्गत सुमारे २,००० किलोमीटर रेल्वे नेटवर्क आणले जाईल. तसेच पुढील तीन वर्षांमध्‍ये ४०० नवीन 'वंदे भारत' रेल्वे सुरु करण्‍यात येतील, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. देशभरात १०० पीएम गती शक्‍ती कार्गो टर्निमलही विकसित करण्‍यात येतील, असेही त्‍यांनी नमूद केले आहे.

"आत्मनिर्भर भारत मोहिमेचा एक भाग म्हणून, सुरक्षा आणि क्षमता वाढीसाठी २०२२-२३ मध्ये २,००० किमी रेल्वे नेटवर्क स्वदेशी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान KAWACH अंतर्गत आणले जाईल. तसेच उत्तम ऊर्जा कार्यक्षमतेसह आणि प्रवासी अनुभव असलेल्या एकूण ४०० नवीन वंदे भारत रेल्वेगाड्यांची निर्मिती करण्यात येईल." असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

तसेच भारतीय रेल्वे छोटे शेतकरी, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी नवीन उत्पादने आणि कार्यक्षम लॉजिस्टिक सेवा विकसित करेल, असेही त्या म्हणाल्या.

शंभर कार्गो टर्मिनल्सची स्थापना करणे, गतीशक्‍ती योजनेद्वारे रेल्वेला बळकटी देणे हे निर्णयही घेण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक पातळीवरील व्यवसाय आणि पुरवठा साखळ्यांना मदत करण्यासाठी वन स्टेशन वन प्रॉडक्टला प्रोत्साहन दिले जाईल," असेही त्यांनी म्हटले आहे.

काय आहे रेल्वेचे सुरक्षा 'कवच'

'कवच' हे अपघात रोखण्यासाठी स्वदेशी विकसित केलेली टक्कर विरोधी यंत्रणा आहे. या माध्यमातून रेल्वे अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्याचे लक्ष्य आहे. रेल्वेच्या समोरासमोरील धडकेतून होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी रेल्वेने TCAS सिस्टम विकसित केली आहे. त्याला कवच असे नाव दिले आहे. ही प्रणाली सॅटेलाइटद्वारे रेडियो कम्युनिकेशनच्या माध्यमातून स्टेशनांवर आपआपसांत संवाद प्रस्थापित करते. यामुळे दुर्घटना टाळल्या जातात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT