नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : AAP Rajya Sabha : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेले संजय सिंह पुन्हा एकदा आम आदमी पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीतील राज्यसभेच्या तीन जागा जानेवारी अखेरीस रिक्त होत आहेत. यासाठी 19 जानेवारीला निवडणूक होणार आहे. या तीन जागांसाठी आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केले. यामध्ये संजय सिंह यांच्यासह दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल आणि नारायण दास गुप्ता यांचा समावेश आहे.
दिल्लीतून रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या तिन्ही जागांवर आपचे खासदार आहेत. यामध्ये संजय सिंह, नारायण दास गुप्ता आणि सुशील कुमार गुप्ता यांचा समावेश आहे. या तिघांपैकी संजय सिंह आणि नारायणदास गुप्ता यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र सुशील कुमार गुप्ता यांचा पत्ता कापण्यात आला. सुशील कुमार गुप्ता यांच्या ठिकाणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना आम आदमी पक्षाने संधी दिली आहे. सुशील कुमार गुप्ता हे हरियाणाच्या राजकारणात सक्रिय होणार आहेत. त्या ठिकाणी आम आदमी पक्ष निवडणूक लढवण्याची योजना आखत आहे. (AAP Rajya Sabha)
दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खासदार संजय सिंह सध्या तुरुंगात आहेत. न्यायालयाने त्यांना तुरुंगातून निवडणूक लढवण्याची परवानगी दिल्यानंतर त्यांनी तुरुंगातूनच उमेदवारी अर्ज दाखल केला. 27 जानेवारीला राज्यसभेच्या या तिन्ही जागा रिक्त होत आहेत. 19 जानेवारीला होत असलेल्या या निवडणुकीसाठी 3 जानेवारीपासून निवडणूक प्रक्रीया सुरू झाली. त्यानंतर 5 जानेवारीला आम आदमी पक्षाने आपले तिन्ही उमेदवार जाहीर केले. सध्या आम आदमी पक्षाचे राज्यसभेत एकूण 10 खासदार आहेत.
स्वाती मालीवाल या महिलांच्या सामाजिक प्रश्नांसह हक्कांसाठी लढणाऱ्या वकील म्हणून परिचित आहेत. यासंदर्भात काम करणाऱ्या विविध चळवळींशी त्या जोडल्या गेल्या आहेत. अण्णा हजारेंच्या आंदोलनातही त्या सक्रिय होत्या. 2015 मध्ये त्या आम आदमी पक्षाच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात आल्या. त्यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी त्यांनी अरविंद केजरीवाल यांचे सल्लागार म्हणूनही काम केले आहे.