Latest

Delhi Air Pollution : दिल्लीतील वायूप्रदूषणावर आप सरकारची धावपळ; ‘राजधानीत मोकळा श्वास घेणे कठीण’

backup backup

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील वाढत्या वायूप्रदूषणामुळे खडबडून जागे झालेल्या आप सरकारने १३ हॉटस्पॉटचा (प्रदूषण स्थानांचा) आढावा घेतला आहे. तसे, प्रदूषणाची कारणे शोधण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्याचाही निर्णय घेतला आहे. (Delhi Air Pollution)

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांच्या अध्यक्षतेखाली आज वायूप्रदूषणाबाबत महत्त्वाची बैठक झाली. वायू प्रदूषणाची  प्रदूषणाची समस्या आणखी गंभीर होत चालली असून सध्या राजधानीतील हवा 'अत्यंत वाईट' श्रेणीत पोहोचली आहे. दिल्लीत हवा प्रदूषणाचे १३ हॉटस्पॉट आहेत. तसेच अन्य ८ ठिकाणी स्थानिक कारणांमुळे हवा गुणवत्ता निर्देशांक ३०० च्या पुढे गेला आहे. या ठिकाणी प्रदूषण होण्याची कारणे काय आहेत, याचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात येतील, असे दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.

दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवेची ढासळती गुणवत्ता हा चिंतेचा विषय असल्याचे सांगताना मंत्री गोपाल राय म्हणाले,की पुढचे १० ते १५ दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांसोबतही प्रदूषणावर चर्चा सुरू आहे. आवश्यकता भासल्यास आणखी नवे निर्बंध आणावे लागतील, असा सूचक इशाराही मंत्री गोपाल राय यांनी दिला.

दरम्यान, दिल्लीतील हवा प्रदूषणामुळे 'इंडिया गेट'देखील धुक्यात लपल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, श्वसनाचे आजार असलेल्या लोकांनी काळजी घ्यावी तसेच खाजगी वाहनांचा वापर कमी करावा, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.

दिल्लीतील वायूप्रदूषणाच्या मुद्द्यावर दिल्ली सरकारने काही दिवसांपूर्वी पर्यावरण तज्ज्ञांची एक बैठक बोलावली होती. यामध्ये २४ संस्था, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ बोलावून हवा प्रदूषण कमी करण्यावर चर्चा झाली होती. यावेळी तज्ज्ञांनी दिलेल्या सूचना सरकारच्या कृती कार्यक्रमात लागू करण्यात येतील.

SCROLL FOR NEXT