Latest

रत्नागिरी: कोणी कितीही गद्दारी केली तरी शिवसैनिकच निवडून येणार; आदित्य ठाकरेंचे बंडखोरांना खुले आव्हान

मोनिका क्षीरसागर

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : जीत कर हारनेवाले को खोके केहते है' असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदेसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला. शिवसेनेशी कोणी कितीही गद्दारी केली, तरी रत्नागिरीत शिवसैनिकच निवडून येणार, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या गटाला खुले आव्हान दिले आहे. शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरीतील सावळी स्टॉपवरील सभेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, आज या खोके सरकारला येऊन अडीच महिने झाले. पण खोके सरकार आजपर्यंत एकही स्वत: केलेले काम दाखवू शकलेले नाही. सध्या सरकार जाहिर करत असलेल्या अनेक योजना या महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाल्या आहेत. आघाडी सरकारच्या योजनेचं या नव्या सरकारकडून फुकटचे श्रेय घेतले जात आहे. महाराष्ट्रात असे घाणेरडे राजकारण कधी झाले नाही. खोके सरकार महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणार? हे मात्र नक्की असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंमध्ये आपण सर्वांनी एक कुटूंबप्रमुख पाहिला आहे. माझ्या वडिलांनी, उद्धव ठाकरेंनी असं यांना काय कमी केलं की यांनी गद्दारी केली, असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी बंडखोर आमदारांना केला आहे. पुढे ते म्हणाले, आत्तापर्यंतच्या देशाच्या ७५ वर्षाच्या इतिहासात असा निर्लज्यपणा कधी पाहिला नाही, इतका निर्लज्यपणा या खोके सरकारने केला आहे. मंत्रीपदं मिळविण्यासाठी माझीही बदनामी या सरकारने सुरू केली आहे. त्यामुळे हे सरकार कोण चालवते ते संपूर्ण महाराष्ट्र पहातच आहे.

फॉक्सकॉन प्रकल्प हा १०० टक्के महाराष्ट्रातच येणार होता. आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पासंदर्भात बैठका झाल्या होत्या.  हा प्रकल्प गुजरातला गेल्याची महाराष्ट्र सरकारला याची लाज वाटली पाहिजे. उद्योगमंत्र्यांना याची माहितीच नव्हती. हा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील लाखो तरूणांच्या हातून रोजगार गेला. हा प्रकल्प गेल्याने सरकार कोण चालवतं हे सर्वांना माहितच आहे, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. 

बंडखोरी केलेले अनेक आमदार कोकणातलेच

शिवसेनेतून बंडखोरी केलेले अनेक आमदार हे कोकणातले आहे. यामध्ये रत्नागिरातील मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ नेते रामदास कदम, त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर शिवसेनेच्या कोकणातल्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले. त्यामुळे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा हा चांगलाच वादळी दिसणार असे दिसत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT