Latest

Alien : शुक्रावर एलियन असल्याचा ‘नासा’च्या महिला वैज्ञानिकाचा दावा

Arun Patil

वॉशिंग्टन : पृथ्वी वगळता इतर ग्रहांवर एलियनचे अस्तित्व आहे की नाही हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे. यासंबंधी वेगवेगळे दावे-प्रतिदावे करण्यात येत असतात; पण अद्यापही एलियनचे अस्तित्व सिद्ध करणारा एकही पुरावा सापडलेला नाही. आतापर्यंत फक्त वेगवेगळे सिद्धांत मांडण्यात आले आहेत. त्यातच आता 'नासा'च्या एका महिला वैज्ञानिकाने शुक्रावर एलियन असू शकतात असा दावा केला आहे. माणसाला सहन न होणार्‍या शुक्र ग्रहावरील वातावरणात एलियन लपून बसलेले असू शकतात असे या वैज्ञानिकाचे म्हणणे आहे.

अमेरिकेतील गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरमधील संशोधन शास्त्रज्ञ डॉ. मिशेल थॅलर यांनी हा नवीन सिद्धांत मांडला आहे. मिशेल थॅलर यांच्या म्हणण्यानुसार, कार्बनडाय ऑक्साईडने भरलेल्या वातावरणात जीवन असण्याची चिन्हे याआधीही दिसली आहेत. ते पाहता कुठेतरी जीवन अस्तित्वात असेल याची खात्री होत आहे. 'द सन'ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. मिशेल थॅलर यांनी यांनी म्हटलं आहे की, शुक्रावरील वातावरणात जीवन असेल याची चिन्हे दिसत आहेत. मला कधीच शुक्रासंबंधी अपेक्षा नव्हती; पण शुक्रावर आता असं वातावरण आहे, जे बॅक्टेरियाद्वारे तयार केले जाऊ शकते असे दिसते,' असे त्या म्हणाल्या आहेत. शुक्राचा आकार आणि रचना पृथ्वीप्रमाणेच असल्याने त्याला 'पृथ्वीचा जुळा' असे म्हटले जाते; पण तेथील वातावरण पृथ्वीपेक्षा पूर्ण वेगळे आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, शुक्र ग्रहावर माणसाला राहणे अशक्य आहे.

सूर्यापासून 67 दशलक्ष मैल अंतरावर असलेला, शुक्र हा आपल्या सौरमालेतील सर्वात उष्ण ग्रह आहे. हे तापमान इतके जास्त आहे की, त्यात शिसे वितळू शकते. शुक्रावरील वातावरण सल्फ्यूरिक अ‍ॅसिड आणि कार्बन डायऑक्साईडपासून बनलेले आहे. हे मिश्रण या असह्य वातावरणात भर घालते. यामुळे 'रनअवे ग्रीनहाऊस इफेक्ट' निर्माण होतो. ज्यामुळे उष्णता बाहेरच्या जागेत जाण्यापासून प्रतिबंधित होते. त्यामुळे तिथे जीवनसृष्टी असेल की नाही यावर शास्त्रज्ञ नेहमीच चर्चा करत असतात. अनेकांचा असा सिद्धांत आहे की ग्रहाच्या पृष्ठभागावर प्रकाशसंश्लेषण शक्य आहे कारण शुक्राला त्याच्या दाट ढगांमधून प्रवेश करण्यासाठी पुरेशी सौर ऊर्जा मिळते.

पण युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधील खगोलजीवशास्त्रज्ञ प्रोफेसर डॉमिनिक पॅपिनो यांनी डॉ. मिशेल थॅलर यांची मते वास्तविकतेशी जोडणारी नाहीत असे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, 'जीवनाशी संबंधित रासायनिक प्रतिक्रियांसाठी द्रवरूप पाणी आवश्यक आहे. म्हणून, बाह्य जीवन शोधण्यासाठी, आपल्याला द्रवरूप पाणी शोधण्याची आवश्यकता आहे आणि पृथ्वीबाहेरील जीवाश्म शोधण्यासाठी भूतकाळात द्रवरूप पाण्याशी संबंधित असलेल्या गाळाचे खडक शोधणे आवश्यक आहे. यामुळे शुक्रावर जीवन आहे याची कल्पना करणे कठीण आहे. शुक्रावर भूतकाळात द्रवरूप पाणी होते असा विचार केला तरी त्याचा पृष्ठभाग खूप गरम आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT