Latest

गुलाबी थंडीत गावकर्‍यांना गरम पाणी देणारे गाव : विदर्भातील रेंगेपार गावाची राज्यभर चर्चा

मोहन कारंडे

राजू मस्के; भंडारा : थंडी सुरू होताच गरम पाण्यासाठी जंगलात जाउन वृक्षतोड करणार्‍या गावकर्‍यांना रोखण्यासाठी आणि पर्यावरण समतोल साधण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील रेंगेपार या गावाने गावकर्‍यांना गरम पाणी देण्याचा उपक्रम भाऊबीजेपासून सुरू केला आहे. या उपक्रमामुळे या गावाची चर्चा राज्यभर होत आहे.

लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोहळी या गावाची लोकसंख्या 1879 असून 120 कुटुंबे येथे राहतात. हिवाळ्यात गरम पाण्यासाठी येथील गावकरी जंगलात जाऊन वृक्षतोड करतात. ही बाब लक्षात घेऊन सरपंच मनोहर बोरकर यांनी गावकर्‍यांना गावातच गरम पाणी देण्याची योजना सुचविली. ग्रामपंचायतचे सचिव हेमकृष्ण लंजे यांनीही या उपक्रमाला दुजोरा दिला. त्यानंतर झालेल्या ग्रामसभेत हा विषय मांडण्यात आला. गरम पाणी मिळणार असल्याने या ठरावाला सर्वानुमते मंजुरी मिळाली. त्यानंतर सरपंच मनोहर बोरकर यांच्या पुढाकाराने सोलर वॉटर हिटर लावण्यात आले आहे. त्यासाठी दोन लाख 98 हजार रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक लंजे यांनी दिली. दीड हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी येथे आहे. सोलर पॅनलद्वारे पाणी गरम होते. भाऊबिजेपासून सकाळी 6 वाजता गावातील 120 कुटुंबांना गरम पाणी दिले जाते.

गरम पाण्यासाठी गावकर्‍यांची एकच गर्दी होत असते. यासाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही. गृहकर व पाणीपट्टी करातून याचा खर्च भागविला जात आहे. या उपक्रमामुळे गावकरी सुखावले असून त्यांना आता जंगलातील लाकडांवर अवलंबून राहावे लागत नाही.

गावातील वातावरण शुद्ध आणि पर्यावरणानुकूल राहण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यातून गावकर्‍यांचा जंगलावरील भार कमी झालेला असून वनसंवर्धन होत आहे. हा उपक्रम अविरत सुरू राहणार आहे.
-हेमकृष्ण लंजे, सचिव ग्रा.पं. रेंगेपार

SCROLL FOR NEXT