Latest

कोल्हापूर : वडणगे पोवार पाणंद मार्गावर पाच गव्यांचा कळप

अमृता चौगुले

वडणगे (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : वडणगे पोवार पाणंद मार्गावर बंडगर मळा येथील उसाच्या शेतात शनिवारी (दि.10) सायंकाळी पाच गव्यांचा कळप निदर्शनास आला. वडणगे येथील बाळासाहेब काटे हे बंडगर मळ्यात ट्रॅक्टरने नांगरट करण्यासाठी गेले असता त्यांना पावणेसहाच्या सुमारास ऊस शेतीतून पाच गवे पंचगंगा नदिच्या दिशेने जात असल्याचे दिसले. मात्र ट्रॅक्टर व शेतकर्‍यांच्या आवाजामुळे हे गवे पुन्हा उसाच्या शेतीत गेले.

दोन दिवसांपासून कसबा बावडा रेणुका मंदिर परिसरात असलेले गवे आज अचानक वडणगे परिसरात दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गवे आढळून आलेल्या परिसरात एका कारखान्याच्या ऊसतोडणी कामगारांची टोळी झोपड्या बांधून राहत आहे. या कारखान्याची याच परिसरात ऊस तोड सुरू आहे.

छत्रपती शिवाजी पूल ते पोवार पाणंद मार्गावरील बंडगर मळा यादरम्यान मोठे गवताचे कुरण आहे. या ठिकाणीच शनिवारी दिवसभर गवे फिरत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

गतवर्षी डिसेंबरमध्ये याच परिसरात गवे आले होते. नदीच्या दोन्ही बाजूला मुबलक गवताळ कुरण व पाणी यामुळे गेल्या काही महिन्यांपासून गवे या ठिकाणी तळ ठोकून आहेत. नदिच्या पश्चिमेला वडणगेच्या बाजूला काही दिवस थांबून गवे आपला मोर्चा पुर्वेला बावड्याच्या बाजूला वळवतात. गव्यांच्या या भटकंतीमुळे नदी काठावरील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.वनविभागाने हे गवे त्याच्या अधिवासात जाण्यासाठी प्रयत्न करावे, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

"शेतीची नांगरट करत असताना अचानक ऊसाच्या शेतातून पाच गवे बाहेर आले. हे गवे नदिच्या दिशेने जात होते. मात्र ट्रॅक्टर व नागरिकांच्या आवाजामुळे ते परत ऊसाच्या शेतीत गेले. गव्यामुळे नांगरट थांबवून माघारी फिरलो. पाच पैकी दोन गवे पूर्ण वाढ झालेले होते".
– बाळासाहेब काटे, वडणगे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT