Latest

Share Market Investment : शेअर मार्केटमध्ये परताव्याचे आमिष; ट्रेडिंग कंपनीचा ५९ जणांना दीड कोटींचा गंडा

backup backup

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात ७७ हजार ठेवीदारांना १ हजार ९६ कोटींचा गंडा घातल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी काही भामट्यांनी गुंतवणुकदारांना लुबाडले आहे. एमएच ट्रेडिंग कंपनीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा आणि दरवर्षी ३० ते ६० टक्के परतावा मिळवा, असे आमिष दाखवून एका दांपत्याने ५९ जणांना १ कोटी ६० लाख रुपयांचा गंडा घातला. उल्कानगरीतील खिवंसरा पार्कमधील एमएच ट्रेडिंग कंपनीत ३१ मे २०२२ ते जून २०२३ दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी ४ नोव्हेंबरला जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हनुमंत शिंदे व मनिषा शिंदे, असे गुन्हा दाखल झालेल्या दांपत्याचे नाव आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली. देवानंद पांडुरंग पेंडलवार (६०, रा. मनाली रेसीडेन्सी, वाळूज महानगर) हे फिर्यादी आहेत. ते नायब तहसीलदार होते. कोरोना काळात त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. दरम्यान, आरोपींचे उल्कानगरीत एमएच ट्रेडिंग कंपनीचे कार्यालय आहे. ते शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचा व्यवसाय करतात. शिंदे यांनी जाहिरात करून गुंतवणुकदारांना आकर्षित केले. त्यातूनच शिंदे व पेंडलवार यांची ओळख झाली होती. त्यांनी ५ टक्के परतावा फिक्स असे सांगत वर्षभरात ३० ते ६० टक्क्यांपर्यंत अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार, पेंडलवार यांनी सुरुवातीला ३ लाख रुपये गुंतविले. त्याचा दर महिन्याला १५ हजार रुपयांप्रमाणे परतावा यायला लागला. तीन ते चार महिने परतावा मिळाल्यावर पेंडलवार यांचा शिंदे दांपत्यावर विश्वास बसला. त्यांनी पुन्हा ५ लाख रुपये गुंतविले. एकूण ११ महिन्यांपर्यंत शिंदेने पेंडलवार यांच्यासह अन्य गुंतवणुकदारांना परतावा दिला. त्यानंतर पेंडलवार यांनी पुन्हा ३ लाख रुपये गुंतविले. शिंदे हा अजून गुंतवणूक करा, असे म्हणत होता. मात्र, पेंडलवार यांनी घरातील सर्व रक्कम गुंतविल्याचे सांगून अधिक गुंतवणुकीस नकार दिला. त्यानंतर शिंदेने त्यांचा परतावा बंद केला. त्यांच्याप्रमपाणेच इतर ५९ गुंतवणुकदारांना परतावा देणे त्याने थांबविले. त्यामुळे जून २०२३ मध्ये गुंतवणुकदारांनी पोलिस आयुक्तांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर ४ नोव्हेंबरला जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक निरीक्षक चंदन करीत आहेत.

फिर्यादीत चौघांचा उल्लेख

फिर्यादी देवानंद पेंडलवार यांनी ११ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांच्या प्रमाणेच केशव सखाराम वाघ यांनी 4 लाख 50 हजार, पोपट नंदू शिंदे यांनी ८ लाख, सरोज प्रमोद सरकले यांनी ७ लाख आणि पल्लवी नितीन वर्णे यांनी २ लाख, अशी एकूण ३२ लाख ५० हजार रुपये रुपये गुंतवणूक केल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे. त्यांच्या प्रमाणेच ५९ जणांनी गुंतवणूक केलेली आहे. त्याचा आकडा १ कोटी ६० लाख रुपये असल्याचे पेंडलवार यांनी सांगितले. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पैसे नसल्याने मुलाचे एमबीबीएस हुकले

देवानंद पेंडलवार यांच्या मुलाने नीट परीक्षा दिली होती. त्याचे एमबीबीएस करण्याचे स्वप्न होते. मार्क्स कमी पडले तरी वडिलांनी त्याला मॅनेजमेंट कोट्यातून एमबीबीएसला नंबर लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांचे पैसे शिंदे दांपत्याने लुबाडल्याने पेंडलवार आर्थिक अडचणीत आले. त्यामुळे त्यांच्या मुलाचे एमबीबीएस करण्याचे स्वप्न अधुरे राहिले. आता त्याचा शासकीय कोट्यातून बीएएमएसला नंबर लागला आहे. त्याला नाईलाजाने बीएएमएस करावे लागत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT