Latest

नेवाळीत किराणा दुकानात सापडला ४ कोटी ५२ लाख २९ हजारांचा ‘एमडी’चा साठा

Shambhuraj Pachindre

नेवाळी; पुढारी वृत्तसेवा : उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चक्क किराणा दुकानात ड्रग्सची विक्री धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेवाळीमधील धामटन येथे गायत्री किराणा दुकानात कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून एमडी ड्रग्स ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी शुक्रवारी (दि.3) सायंकाळी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या फरार असलेल्या आरोपीचा शोध कल्याण गुन्हे शाखेकडून सुरु आहे.

उल्हासनगर परिमंडळ ४ अंतर्गत येणाऱ्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्रामीण भागात सध्या ड्रग्स माफिया आणि गुटखा माफियांनी आपले बस्तान मांडले आहेत. गुटखा कारखान्यावर धाड टाकण्याचे प्रकरण ताजे असतानाच काटई बदलापूर महामार्गावरील धामटन येथेही किराणा दुकानात सापळा रचून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली.

या कारवाईत कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने तीन मोबाईल,१४ हजार रुपयांची रोख रक्कम आणि ४ कोटी ५२ लाख २९ हजारांचे एमडी ड्रग्स जप्त केले. या प्रकरणी राजेश कुमार प्रेमचंद तिवारी या आरोपीच्या गुन्हे शाखेचे मुसक्या आवळल्या आहेत. तर शैलेश राकेश अहिरवाल हा आरोपी दुकानाच्या परिसरातून पलायन करण्यात यशस्वी झाला आहे.

मलंगगड भागातील ग्रामीण भाग सध्या नशेखोरांना पाठबळ देणार ठिकाण ठरू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून मलंगगड भागात गुन्हे शाखेच्या पथकांकडून गावठी दारूच्या भट्ट्या, गुटखा कारखाना उद्वस्त केले होते. यानंतर आता थेट किराणा दुकानातील ड्रग्स विक्री देखील ग्रामीण भागातून समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे जर कल्याण गुन्हे शाखा ग्रामीण भागात मोठं-मोठ्या कारवाया करत असताना स्थानिक पोलीस यंत्रणा काय करत आहे? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामटन परिसरातून डोंबिवली मधील उच्चभ्रू सोसायटीत,उल्हासनगर,नेवाळी परिसरात व्हॉट्सअँपच्या माध्यमातून ड्रग्स विक्री केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सध्या आरोपींकडून ताब्यात घेण्यात आलेल्या मोबाईल मधून अधिकचा तपास सुरु करण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात शनिवारी (दि.4) कल्याण गुन्हे शाखेकडून पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले असून त्यावेळी माध्यमांना माहिती देण्यात येणार असल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT