Latest

पुण्याच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसने घेतला अचानक पेट ; सुदैवाने जीवितहानी नाही

अमृता चौगुले

वरकुटे बुद्रुक : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर महामार्गावर तुळजापूरवरुन पुण्याच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसच्या मागील चाकांमध्ये बुधवारी (दि. १७) अचानक आग लागली. वेळीच ही बाब रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनचालकांनी बस चालकाच्या निदर्शनास आणून दिल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

मागील चाकाच्या लायनरने पेट घेतल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती चालकाकडून मिळाली. या बसमध्ये जवळपास १९ प्रवासी होते. हे सर्व प्रवासी सुखरुप असून त्यांना दुसऱ्या बसमधून मार्गस्थ करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एमएच ०९ ईएम १३८२ या क्रमांकाची शिवशाही बस तुळजापूरवरुन पुणे येथे निघाली होती. पुणे-सोलापूर महामार्गावर सोलापूर- पुणे लेनवर इंदापूर तालुक्यातील लोंढेवस्ती नजीक ही बस आली असता बसच्या मागील चाकांना अचानक आग लागल्याचे याच मार्गावरुन प्रवास करणाऱ्या लक्ष्मण बागल व मोहन शिंदे यांना दिसले.

त्यांनी बस चालकाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्याने वेळीच प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या कडेला थांबवली. गाडीतील प्रवाशांना खाली उतरवले. गाडीत असणारी अत्यावश्यक अग्निसुरक्षा यंत्रणा घेऊन त्या ठिकाणी फवारणी केल्याने वेळीच ही आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.

दरम्यान ही घटना समजताच हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची अग्निसुरक्षा यंत्रणादेखील घटनास्थळी तत्परतेने दाखल झाली. त्याचसोबत इंदापूरचे पोलीस निरीक्षक मुजावर आणि महामार्ग पोलीस मदत केंद्र इंदापूरचे कर्मचारी देखील या घटनास्थळी धावून आले.

SCROLL FOR NEXT