पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरीत श्री विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी वर्षभरात सव्वा कोटीहून अधिक भाविक येतात. चार मोठ्या यात्रांना लाखोंची संख्या असते. दररोज हजारो भाविक येतात. येणारे भाविक श्री विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन झाले की श्रींचा प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू खरेदी करतात. मात्र, या प्रसादाच्या लाडूमुळे भाविकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा लेखापरीक्षण अहवाल नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आला आहे. यामुळे भाविकांमधून मंदिर समितीच्या कामकाजाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
सध्या सुरु असलेल्या नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनात 'श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती'चा एक वर्षाचा (2020-21) लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात आला. त्यावेळी ही माहिती समोर आली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे कामकाज पंढरपूर मंदिरे अधिनियम, 1973 अन्वये चालविण्यात येते. या मधील तरतुदीनुसार मंदिर समितीचा लेखापरीक्षण अहवाल व त्यावर माननीय धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या निदेशांचा अनुपालन अहवाल राज्याच्या विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्याची तरतूद आहे. त्यानुसार 2021 ते 2022 या आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल व त्याचा अनुपालन अहवाल विधानमंडळाच्या विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहांमध्ये पटलावर ठेवण्यात आला.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरच्या वतीने श्रींचा प्रसाद म्हणून भाविकांना बुंदी लाडूप्रसाद उपलब्ध करून देण्यात येतो. या बुंदी लाडूप्रसाद आऊटसोर्सिंग पध्दतीने खरेदी करण्यात येत होता. सदरचा लाडूप्रसाद संबंधित पुरवठाधारकाकडून पुरेसा व चांगल्या गुणवत्तेचा मिळत नाही. याबाबत सदरचे लेखापरीक्षण अहवालामध्ये काही आक्षेप आले होते. त्यांचा ठेका रद्द करून मंदिर समिती मार्फत आवश्यक कच्चा माल खरेदी करून बुंदीचा लाडूप्रसाद तयार करून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येत आहे. त्यांच्याकडून तपासणी करून घेऊन व त्यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून लाडू प्रसादाची निर्मिती करण्यात येत असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले आहे. मात्र, लेखापरीक्षण अहवाल व त्याचा अनुपालन अहवाल आक्षेप घेण्यात आला आहे.यामुळे मंदिर समितीच्या कामकाजाचा भोंगळ कारभार समोर आल्याचे दिसत आहे.
दरम्यान, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड म्हणाले की, ज्या वर्षाचा अहवाल सादर झाला आहे. त्यावर्षी लाडू तयार करण्याचे काम एजन्सीमार्फत केले जात होत. एजन्सीमार्फत लाडू तयार न करता वर्षभरापासून मंदिर समिती स्वत: लाडू बनविण्याचे काम करत आहे. त्यामुळे स्वच्छता पाळणे, शेंगदाना तेल तसेच जे जे घटक आवश्यक आहेत. ते ते घटक लाडू मध्ये टाकून लाडू बनविण्यात येत आहेत.
या लेखापरीक्षण अहवालामध्ये लाडू प्रसाद पुरवठा करणार्या ठेकेदारांकडून पुरेसा व चांगल्या गुणवत्तेचा लाडू प्रसाद न देणे, शेंगदाणा तेलऐवजी सरकी तेलाचा वापर करणे, पुरेशा प्रमाणात ड्रायफ्रूटस न वापरणे, स्वच्छता न ठेवणे, प्रसाद म्हणून एका पाकिटात तीन लाडू भरणे, पाकीट 20 रुपयांना विकले जाते, भाविकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. लाडू बनविणार्या एजन्सीबरोबरच मंदिर समिती देखील तेवढीच जबाबदार आहे, असे स्पष्ट निरीक्षण लेखापरीक्षण अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल बीएसजी अॅन्ड असोसिएटस पुणे यांनी नोंदवला आहे.