Latest

पुढारी सहकार महापरिषद: पतसंस्थांच्या प्रश्नांवर 15 दिवसांत बैठक घेणार ; आमदार प्रवीण दरेकर यांची ग्वाही

अमृता चौगुले
पुणे :  पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील ग्रामीण भागाच्या विकासात पतसंस्थांचे मोलाचे योगदान असून, पतसंस्थांच्या अडचणींसाठी त्यांची वकिली करायला मी तयार आहे. त्यासाठी सहकारमंत्री अतुल सावे यांच्यासमवेत संयुक्त बैठक येत्या 15 दिवसांत घेण्यात येईल आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी येथे दिली.  दै. 'पुढारी' वृत्तपत्र समूहाला सहकाराची बांधिलकी असून, 'पुढारी'ने पुढाकार घेतल्यामुळे  या चळवळीचे प्रश्न निश्चित मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दै. 'पुढारी'च्या वतीने शनिवारी (दि.24) आयोजित पुढारी सहकार महापरिषदेच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट महाराष्ट्रचे अध्यक्ष सुरेश वाबळे,  लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे पुणे विभागीय प्रमुख सुशील जाधव, गो-कॅशलेस इंडिया प्रा.लि.चे चेअरमन कृष्णत चन्ने, जिल्हा उपनिबंधक (पुणे शहर)  संजय राऊत आदी उपस्थित होते. या वेळी पुणे आणि अहमदनगरमधील पतसंस्था, मल्टिस्टेट सोसायट्यांच्या प्रतिनिधींना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
दरेकर म्हणाले, मगरज पडली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही पतसंस्थांच्या प्रश्नांवर चर्चा केली जाईल. सहकारातून झालेला विकास केंद्रस्थानी ठेवून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र सहकार मंत्रालय सुरू केले. राज्यातील विकासात सहकाराचे मोठे योगदान असून, ही चळवळ  टिकली पाहिजे, भक्कम झाली पाहिजे, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. खेड्यांपर्यंत दूरवर पोहोचलेल्या पतसंस्था चळवळीत दोन-चार लोकांनी चूक केली असेल, तरीही संपूर्ण सहकाराला बदनाम करण्याचे काम केले जाते आणि पतसंस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पतसंस्था चळवळ ही आपापल्यापरीने सर्व पातळ्यांवर अडचणी मांडत असते.
पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण हवे
राज्यात 16 हजारांहून अधिक पतसंस्था कार्यरत असून, यामध्ये हजारो कोटी रुपयांची उलाढाल होऊन अनेकांना रोजगार मिळतो. बँकांमधील पाच लाख रुपयांच्या ठेवींना विम्याचे कवच आहे. मात्र, पतसंस्थांमध्ये ही स्थिती नाही. त्यामुळे पतसंस्थांमधील ठेवींनाही सुरक्षा हवी, अशी मागणी आहे. अडचणीत असलेल्या पतसंस्थांना सरकारने पाठिंबा देणे गरजेचे आहे. पतसंस्थांमध्ये सर्वसामान्यांच्या ठेवी असतात.केंद्र सरकारच्या चर्चेमध्ये संबंधित विभागाच्या मंत्र्यांबरोबर माझी चर्चा झाली आहे. छोट्या पतसंस्था किंवा सहकारी बँका यांना अशा प्रकारची कुठलीच मदत दिली जात नाही.  ही विसंगती मी केंद्रीय मंत्र्यांकडे मांडली आहे. सहकार चळवळीला राज्य सरकारकडून राजाश्रय मिळाला पाहिजे. सहकार चळवळ टिकली पाहिजे. सरकारच्या माध्यमातून आपण ते घडवून आणू. जे जे सरकार पातळीवर पतसंस्थेचे विषय आहेत. ते मार्गी मार्गी लावू, अशी ग्वाही देत सहकार चळवळीसाठीची ही सहकार परिषद निश्चितच यशस्वी होईल, असेही दरेकर म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दै. पुढारीचे मार्केटिंग विभागाच्या पुणे युनिटचे प्रमुख संतोष धुमाळ यांनी केले.
आ. दरेकर यांनी शासनदरबारी प्रश्न मांडावा : काकासाहेब कोयटे
आमदार प्रवीण दरेकर हे सहकार चळवळीतील ज्येष्ठ नेते आहेत. शिवाय तुम्ही सरकारमध्ये कार्यरत असल्यामुळे पतसंस्थांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासनदरबारी आमची वकिली करावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी मनोगतात व्यक्त केली. दरेकर यांनी सहकार चळवळीत तळागाळापासून काम केलेले असून, त्यांना पतसंस्थांच्या प्रश्नांची जाणीव असल्याने ते आपले प्रश्न निश्चित सोडवतील, असा विश्वासही कोयटे यांनी व्यक्त केला. तोच धागा पकडत आ. दरेकर यांनी पतसंस्थांच्या प्रश्नांसाठी वकिली करायला तयार असल्याचे स्पष्ट करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
'पुढारी'ला धन्यवाद
दै. 'पुढारी'चा  मी वाचक आहे. या माध्यमसमूहाने पतसंस्था आणि सहकार विभागास एका व्यासपीठावर आणून समस्यांवर ऊहापोह केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. सहकार क्षेत्राचे प्रश्न सोडवणुकीत 'पुढारी'चा आजवर मोलाचा वाटा राहिलेला असल्याचे गौरवोद्वगारही दरेकर यांनी या वेळी काढले.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT