मुंबई : पुढारी वृत्तसेवा : पनवेल-सीएसएमटी लोकलचा एक डबा सोमवारी साडेअकराच्या दरम्यान सीएसएमटी रेल्वे स्थानकात शिरताना रुळांवरुन घसरल्याने हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकलची वाहतूक तब्बल चारतास खोळंबली. या अपघातामुळे हार्बर मार्गावरील 52 लोकल रद्द तर 26 लोकल वडाळा स्थानकापर्यंत चालवल्या होत्या. रूळांवरून घसरलेल्या लोकलचा वेग ताशी 15 किमी इतका असल्यामुळे कुठल्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.
मोटरमनने वेगावर नियंत्रण मिळवत लोकल थांबवण्यात यश मिळवले. लोकल थांबताच प्रवाशांनी रुळावर उड्या घेतल्या. या घटनेमुळे काहीकाळ प्रवाशांमध्ये अस्वस्थता, गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे रुळावरून घसरलेला लोकल ट्रेनचा डबा उचलून रेल्वे रुळावर आण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले.
दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास हा घसरलेला डबा रुळांवरुन बाजूला करण्यात आला. त्यानंतर रुळांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी वाहतुकीकरिता रुळ सुरू करण्यात आला. मात्र, गाड्यांचे बंचिग झाल्याने वाहतुक सुरळीत व्हायला सायंकाळचे पाच वाजले. दरम्यान या अपघाताच्या चौकशीसाठी एका समितीची स्थापना केली आहे.
रुळांवरुन डबा घसरल्याने सीएसएमटी-पनवेल लोकल सेवा पुरती कोलमडली. सीएसएमटीकडे येणार्या लोकल एका मागे एक उभ्या होत्या. लोकलमध्ये प्रवासी अडकून पडले होते. त्यातच उन्हाचा तडाखा वाढल्याने प्रवासी हैराण झाले होते. हार्बर मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकात प्रवाशांची एकच गर्दी झाली होती. सीएसएमटीला जाणार्या प्रवाशांना कुर्ला स्थानकात उतरुन मेन लाईनने प्रवास करावा लागला.
वाशी ते कुर्ला स्थानकांदरम्यान लोकलचा वेग खूपच मंदावला होता.प्रत्येक स्थानकात शिरण्यापूर्वी लोकल किमान 10 ते 15 मिनिटे थांबत होती. त्यामुळे प्रवाशांनी रुळावर उतरत पायी चालत जाणे पसंत केले. सीवूड ते सीएसएमटी या प्रवासाकरिता सोमवारी अडीच तास लागले. एरव्ही हा प्रवास एका तासात पूर्ण होतो.
सीएसएमटी स्थानकात येणार्या लोकलचा डब्बा घसरल्याचा परिणाम मेन लाईनवर देखील झाला. हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर स्थानकात हार्बर मार्गावरील चार गाडया एकामागोमाग एक उभ्या होत्या. या लोकलमधील प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने या गाड्या मेन लाईनने सीएसएमटी स्थानकापर्यत आणल्या.त्यामुळे मेन लाईनवर वाहतुकीचे वेळापत्रक काही काळासाठी विस्कळीत झाले होते.
हार्बर मार्गावरील वाहतुकीचे तीन तेरा वाजल्याने दैनंदिन प्रवाशांसह सीईटी परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना फटका बसला. सोमवारी सीईटीच्या बी ग्रुपची परीक्षा महामुंबईतील विविध केंद्रांवर होती. परंतु, लोकल गोंधळामुळे परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास उशिर झाल्याने काही शाळा-महाविद्यालयांच्या प्रशासनाने अनेक ठिकाणी सीईटीची परीक्षा देणार्या परीक्षार्थ्यांना बसण्यास मज्जाव करून माघारी पाठवले.