Latest

सांगली : चूक बिबट्यांची नव्हे… दोन पायांच्या प्राण्यांची…

दिनेश चोरगे

सांगली; विशेष प्रतिनिधी : चूक वन्यप्राण्यांची नाही, तर माणसांची आहे. वन्यप्राणी माणसाच्या घरात कधीच घुसलेले नाहीत. माणसांनीच वन्यप्राण्यांच्या घरात अतिक्रमण केले आहे. केवळ अतिक्रमण नव्हे तर त्यांचे जीणे हराम केलेले आहे. त्यांनी भूक-तहान भागवायची कशी? असा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. विचार करा, माणूसप्राण्याचे अन्न-पाणी तोडले तर तो काय करेल ?

चांदोली परिसरातील शाहुवाडी तालुक्यात येणार्‍या शित्तुरजवळील तळीचा वाडा येथील चिमुरडीवर बिबट्याने हल्ला केला. त्यात तिचा मृत्यू झाला. ही सोमवारची घटना. काही महिन्यांपूर्वी येथील केदारलिंगवाडी येथे एका दहा वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला, त्यात तिचा मृत्यू झाला होता. अशा अनेक घटना सांगता येतील. मान्य की, अशा घटना हळहळायला लावणारच. या घटनानंतर जे बोललेे, लिहिले जाते, ते महाभयंकर. वन्यप्राण्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून आरोपांचा भडीमार सुरू होतो. विचार करा की, वन्यप्राण्यांनी माणूस नावाच्या प्राण्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले तर ते काय-काय आरोप करतील? पहिला प्रश्न असेल, आमच्या जिवावर का उठता? आम्ही काय खायचं? पाणी कुठं प्यायचं? आणि जगायचं कसं? पोट भरले, ढेकर येत नाही, तरीही तुम्ही खा-खा खात सुटता. आम्ही पोट भरल्यावर खात नाही. आम्ही साठवूनही ठेवत नाही.

चांदोली परिसरात मानवी वस्ती सध्या वन्यप्राण्यांचे आश्रयस्थान बनू लागली आहे. अन्नाच्या शोधात अनेक प्राणी चांदोलीसह जिल्ह्यातील अनेक गावांत भटकतात. यामध्ये बिबट्या व गव्यांचे प्रमाण अधिक आहे. चांदोली परिसरात अनेक पाळीव प्राणी बिबट्याचे दररोज भक्ष्य बनत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल होणे साहजिकच. पशुधनावर हल्ला करणारा बिबट्या माणसांवरही हल्ले करत आहे. बिबट्याच्या क्षेत्रात त्याच्या अन्नसाखळीची यथोचित व्यवस्था करणे वनखात्याचे काम. ते काम यथोचित होत नाही. सरकार याविषयी गंभीर असल्याचे कृतीतून कधी दिसत नाही. पंचनामा, तुटपुंज्या भरपाईसाठी कागदं रंगविणे इतकेच वनखात्याचे काम नाही. यंदा तर पाऊस कमी. त्यामुळे गवे, बिबटे अन्नाच्या शोधात जंगलाबाहेर पडणारच. चुका माणसांनी केलेल्या आणि करतही आहोत. सहजीवन आणि चुकांची दुरुस्ती, इतकेच दोन पायांच्या प्राण्याच्या हाती उरते.

वन्यप्राणी पाहिजेत की नकोत ?

वन्यप्राण्यांचे जंगलरूपी घर नीटच राहील, याची काळजी माणूसप्राण्याने घ्यायला पाहिजे. वन्यप्राण्यांसह माणूस जगायला शिकला तरच तो टिकेल. वन्यप्राणीच नष्ट करणे म्हणजे आपल्याही अंताला आमंत्रण देणे, असे तज्ज्ञ मंडळी सांगतात.

SCROLL FOR NEXT