Latest

भूक लागली म्हणून एका जाेडप्याने मागवले २ बर्गर; बिल पाहून बसला धक्‍का

Arun Patil

जिनेव्हा : प्रत्येक ठिकाणाचे स्वत:चे काही तरी वैशिष्ट्य असते. काही आपल्या निसर्गसौंदर्यामुळे, तर काही आपल्या आधुनिकतेमुळे. याशिवाय, काही जागा तर इतक्या महागड्या असतात, जेथे कोणतीही वस्तू पोहोचली तरी ती महागडी होते. स्वित्झर्लंडमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या एका जोडप्याला दोन बर्गर खाल्यानंतर हाच अनुभव पचवावा लागला. या जोडप्याने भूक लागली म्हणून दोन बर्गर मागवले. पण, केवळ दोन बर्गरसाठी ज्यावेळी 8 हजार 345 रुपयांचे बिल दिले गेले, त्यावेळी मात्र केवळ 500 ते हजारभर रुपयांचे बिल होईल, असे मानणार्‍या या जोडप्याला चांगलाच धक्का बसला.

एरवी दोन बर्गरची किंमत 500 रुपये ते हजार रुपयापेक्षा जास्त असण्याचे कारण नाही. ऑस्ट्रेलियातील जोडप्याने स्वित्झर्लंडमधील एक रेस्टॉरंट गाठले, त्यावेळी त्यांचीही कल्पना हीच होती. ते ग्राईंडेवॉल्ड या गावात उतरले होते. आता स्वित्झर्लंड महागडे ठिकाण आहे, हे त्यांना ज्ञात होते. पण, ते इतके महागडे असेल की दोन बर्गर खाण्यासाठीही खिसा रिकामा करावा लागेल, यापासून मात्र ते अनभिज्ञ होते.

त्यांनी या रेस्टॉरंटमध्ये दोन बर्गर, फ्राईज व एक सोडा अशी ऑर्डर दिली. पण, याबदल्यात त्यांना 8,345 रुपयांचे बिल देण्यात आले, त्यावेळी ते थक्क झाले. ऑस्ट्रेलियातील ते जोडपे ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. मात्र, इतके पैसे द्यावे लागतील, हे माहीत असते, तर आपण ते बर्गर मागवलेच नसते, असे त्यांनी म्हटले. नेटिझन्सनी मात्र बर्‍याच प्रमाणात या बिलाचे समर्थन केले असून, स्वित्झर्लंडमधील महागाई पाहता यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, असे ते म्हणतात.

SCROLL FOR NEXT