Latest

रक्तदान करून २४ लाख मुलांचे प्राण वाचवणारे आजोबा

Arun Patil

सिडनी : एखाद्याला जीवनदान देणे हे माणुसकीचे मोठे लक्षण आहे. त्यासाठी अवयवदानापासून रक्तदानापर्यंतच्या अनेक मार्गांचाही उपयोग केला जात असतो. सर्वश्रेष्ठ दान म्हणून ओळखल्या जाणार्‍या रक्तदानाने अनेकांचा जीव वाचलेला आहे. अनेकदा रक्त वेळेत न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. मात्र, जगात एक अशी व्यक्ती आहे जी नियमितपणे रक्तदान करते आणि त्याचा फायदा काही शे किंवा हजार नाही तर लाखो चिमुकल्यांना झाला आहे. लाखो बाळांचे प्राण वाचवणार्‍या या व्यक्तीचे नाव आहे जेम्स हॅरिसन. ऑस्ट्रेलियात राहणार्‍या या आजोबांनी मागील 60 वर्षांमध्ये असंख्य वेळा रक्तदान करून तब्बल 24 लाख मुलांचे प्राण वाचवले आहेत. त्यांना 'मॅन वीथ द गोल्डन आर्म' नावानेही ओळखले जाते.

हॅरिसन हे सध्या 81 वर्षांचे आहेत. ते वयाच्या 21 व्या वर्षापासून नियमितपणे रक्तदान करतात. त्यांनी याच आठवड्यात बुधवारी रक्तदान केले आहे. वैद्यकीय नियमानुसार 81 वर्षीय व्यक्तीला रक्तदान करता येत नाही. मात्र, हॅरिसन हे स्पेशल केस आहेत. खरं तर त्यांच्या या स्पेशल असण्याची गोष्ट त्यांच्या वयाच्या 14 व्या वर्षापासून सुरू होती. हॅरिसन यांच्या छातीची शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी रक्तदाता मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले होते. त्यामुळेच आपण एक आदर्श रक्तदाता व्हायचं असं ठरवलं होतं. हॅरिसन यांनी ऑस्ट्रेलिया रेड क्रॉसमध्ये 1100 हून अधिक वेळा रक्तदान केलं आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार हॅरिसन यांचं रक्त हे सर्वसामान्य व्यक्तीच्या रक्तासारखं नाही. हॅरिसन यांच्या रक्तामध्ये एक दुर्मीळ अँटीबॉडीज आहेत. या अँटीबॉडीज रीसस नावाच्या रोगाविरुद्ध लढण्यासाठी फार फायद्याच्या आहेत.

रीसस निगेटिव्ह असलेली गर्भवती महिला रीसस-पॉझिटिव्ह मुलाला जन्म देते तेव्हा त्याचा परिणाम त्या चिमुकल्यावर होतो. अशा बालकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अँटीबॉडीज तयार करतात. मात्र, या अँटीबॉडीज या बालकांच्या रक्तवाहिन्यांवरच हल्ला करतात. यामुळे बालकांच्या मेंदूला कायमची इजा होण्याची शक्यता असते. गुंतागुंत वाढत गेल्यास बाळाचा मृत्यूही होऊ शकतो. हॅरिसन यांचं रक्त या समस्येवर रामबाण उपाय ठरलं. त्यांच्या रक्तामध्ये असलेल्या अँटीबॉडीजचा फायदा अँटी-डी नावाचं इंजेक्शन तयार करण्यासाठी झाला. खरं तर हा शोध आरोग्य क्षेत्रातील चमत्कारच होता. रीससविरुद्ध लढण्यासाठी या इंजेक्शनच्या माध्यमातून एक उत्तम शस्त्र डॉक्टरांना सांपडलं. हॅरिसन यांनी केलेल्या या सहकार्याचा फायदा 20 लाखांहून अधिक महिलांना झाला.

1967 मध्ये नकारात्मक रक्त प्रकार असलेल्या ऑस्ट्रेलियातील महिलांना अँटी-डीचे तब्बल 30 लाखांहून अधिक डोस देण्यास आले. ऑस्ट्रेलियामध्ये केवळ 50 जणांमध्ये नैसर्गिकरीत्या या अँटीबॉडीज आढळतात. हॅरिसन यांच्या रक्तामध्ये या अँटीबॉडीज कशा तयार झाल्या हे अद्याप समजलेलं नाही. 14 व्या वर्षी झालेल्या शस्त्रक्रियेमुळे हॅरिसन यांच्या रक्तामध्ये या अँटीबॉडीज तयार झाल्याचं सांगितलं जातं. हॅरिसन यांना त्यांच्या या समाजउपयोगी कार्यासाठी अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. त्यांना 'मेडल ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT