Latest

दारूच्या नशेत फुशारक्या मारताना ३० वर्षांपूर्वीच्या दुहेरी खुनाचा छडा

मोहन कारंडे

मुंबई : वृत्तसंस्था : दारूच्या नशेत फुशारक्या मारताना लपवून ठेवलेली माहिती उघड झाली आणि तीन दशकांपूर्वी लोणावळ्यात झालेल्या दुहेरी खुनाचा उलगडा झाला. मुंबई गुन्हे शाखेने इतकी वर्षे यशस्वीपणे खून लपवणाऱ्या गुन्हेगाराला अखेर बेड्या ठोकल्या.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अविनाश पवार असे आहे. तो मूळचा लोणावळ्याचा आहे. त्याने ऑक्टोबर १९९३ मध्ये दोन मित्रांसोबत चोरी करताना धनराज कुरवा व त्यांची पत्नी धनलक्ष्मी कुरवा या वृद्ध जोडप्याचा खून केला होता. या प्रकरणातील अमोल काळे व विजय देसाई या दोघांना अटक करण्यात आली होती. मात्र अविनाश हाती लागत नव्हता.

आईला लोणावळ्यातच सोडून तो खुनानंतर दिल्लीला गेला. तेथून तो महाराष्ट्रात आला व छत्रपती संभाजीनगरात राहू लागला. तेथेच त्याने अमित पवार या नावाने ड्रायव्हिंग लायसन्सही काढले. त्यानंतर तो संभाजीनगरहून पिंपरी-चिंचवडला व नंतर नगरला स्थायिक झाला. काही वर्षांपूर्वी तो मुंबईत विक्रोळीत स्थायिक झाला. तेथेच त्याने नवीन नावाने आधार कार्डही काढले, लग्न केले आणि पत्नीला राजकारणात उतरवले. पोलिसांनी सांगितले की, खुनानंतर ३० वर्षांपूर्वी त्याने लोणावळा सोडले व मागे वळून बघितलेच नाही. अगदी आईला भेटायलाही तो एकदाही लोणावळ्याला गेला नाही. इतकेच काय, पत्नीच्या माहेरच्या लोकांना भेटायलाही लोणावळ्याला गेला नाही पोलिस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी सांगितले की, लोणावळ्यात पवारचे छोटे दुकान होते. त्या दुकानाजवळच राहणाऱ्या एकावृद्ध जोडप्याचे घर लुटण्याचा कट त्याने आखला होता. त्यातच त्याने त्यादोघांचा खून केला. तो सतत नाव व गाव बदलत फिरत होता.

अशी मिळाली टीप

आता आपण पकडले जाणार नाही याची त्याला पूर्ण खात्री होती. पण काही दिवसांपूर्वी एका पार्टीत दारूच्या नशेत फुशारक्या मारताना त्याने खुनाची माहिती सांगितली. ही खबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दया नायक यांना त्यांच्या खबऱ्याने सांगितली. यानंतर शुक्रवारी पवारला विक्रोळीतून अटक करण्यात आली.

SCROLL FOR NEXT