Latest

कॅनडामधील आठ शहरांत रचला जातोय भारताविरोधी कट : गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला इशारा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंजाबमधील खलिस्‍तानी दहशतवाद्‍यांना पाठिंबा देत पंजाबमध्‍ये अशांतता पसरविण्‍यासाठी कॅनडातील आठ शहरांतून कट रचला जात आहे. यासाठी कॅनडातील काही गुरुद्वारांचाही यासाठी वापर केला जात आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी पंजाब सरकारला दिला आहे. तसेच राज्‍यातील खलिस्तान समर्थक आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आवाहनही केले आहे.

राज्य सरकारला पाठवलेल्या अहवालात गुप्तचर यंत्रणांनी कॅनडातील आठ शहरांचाही उल्लेख केला आहे. यातील एका शहरात दहशतवादी निज्जरची जून महिन्‍यात हत्या करण्यात आली होती. कॅनडातील काही शहरांमध्ये भारतविरोधी पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या शहरांमध्ये दहशतवादी आणि खलिस्तान समर्थकांना काही धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समित्याही मदत करत आहेत. एजन्सींनी अशा गुरुद्वारा व्यवस्थापकांची यादीही तयार केली आहे. भारतातील त्यांच्या जवळच्या आणि नातेवाईकांवर लक्ष ठेवण्यासाठी ही यादी पंजाब सरकारलाही गुप्‍तचर विभागाने राज्‍य सरकारला दिली आहे.

गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे की, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिस ट्रूडो यांनी खलिस्तान समर्थकांच्या बाजूने केलेल्या वक्तव्यानंतर सरे, ब्रॅम्प्टन आणि व्हँकुव्हरमध्ये भारतविरोधी प्रचार वाढला आहे. खलिस्तान मोहिमेला चालना देण्यासाठी कॅनडातील काही शहरांमध्ये पुन्हा सार्वमत घेण्याची तयारी सुरू करण्यात आल्याचेही गुप्‍तचर संस्‍थेने म्‍हटले आहे.

पंजाबमधील अमृतपाल सिंगच्या अटकेबाबत कॅनडामध्ये धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली जात आहे. त्याचवेळी, पंजाब पोलिसांच्या इंटेलिजेंस विंगच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कॅनडातील आठ शहरांतून प्रवास करणाऱ्या खलिस्तानींच्या जवळच्या नातेवाईकांवर नजर ठेवली जात आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT