मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारला आणि प्रशासनाला गंडवून खोट्या सह्या अन् कागदपत्रे तयार करत आपली कामे साधणार्या ठग कर्मचार्यांचा ससेमिरा मंत्रालयाच्या पाठी कायम असल्याचे दिसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह्या करून परस्पर बदल्या व निधी लाटण्याचे प्रकरण पोलिसांत पोहोचले असतानाच यापूर्वी उघडकीस आलेल्या अशाच प्रकरणांत गृह खात्याचे तत्कालीन उपसचिव किशोर भालेराव यांच्यासह आता तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ( Ministry )
संबंधित बातम्या
हे प्रकरण विशेषत: गृह खात्याशीच संबंधित आहे. भालेराव यांच्याशी संगणमत करून काही जणांनी बोगस कागदपत्रे तयार केली. केवळ बदल्या व निधी मिळवण्याच्याही पलीकडे जात या मंडळींनी चक्क नियुक्त्याही करवून घेतल्या. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर भालेराव हे दोषी आढळले. त्यांच्यासह विशेष सरकारी वकील शेखर जगताप, शामसुंदर अग्रवाल आणि शरद अग्रवाल यांनाही सहआरोपी करत त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. कोणतीही कायदेशीर मान्यता न घेता भालेराव यांनी सरकारी वकिलांच्या नियुक्त्या परस्पर आदेश देत केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना आता निलंबित करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गँगस्टर छोटा शकीलशी संबंधित प्रकरणात या मंडळींनी खोटी कागदपत्रे तयार करून विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती परस्पर करून टाकली. विशेष म्हणजे ही बोगस कागदपत्रे बार काऊन्सिलकडेही देण्यात आली. गृह खात्याने केलेल्या चौकशीत हा सर्व प्रकार बोगस असल्याचे उघड झाले. या बनवाबनवीबद्दल भालेराव आणि त्यांच्या साथीदारांवर भादंवि कलम 170, 420, 465, 467, 468, 471, 474 आणि 120 ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Ministry )