Latest

ठाकरे सेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल

backup backup

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या नेतेमंडळींविरोधातील चाैकशा आणि गुन्हे दाखल होण्याचे शुक्लकाष्ठ काही संपताना दिसत नाही. किशोरी पेडणेकर, सुरज चव्हाण यांच्या पाठोपाठ आता ठाकरे सेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिका अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरुन आझाद मैदान पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाची डोकेदुखी वाढलेली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या क्रीडांगण आणि उद्यानाच्या जागेवर अनधिकृत कब्जा करुन बांधकाम करत मातोश्री स्पोर्टस ट्रस्ट आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने वायकर यांनी ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील व्यारवली गावातील जमिनीवर वायकरांनी दोन लाख चौरस फुटांचे पंचतारांकित हॉटेल बांधण्यास सुरुवात केली आहे. या हॉटेलची किंमत ५०० कोटी रुपये इतकी आहे. वायकर यांनी ही जागा एका कंपनीकडून ताब्यात घेतली होती.

बागेचे आरक्षण दाखवून चार कोटी रुपये रेडी रेकनर मूल्याचा भूखंड तीन लाख रुपयांना खरेदी केला. त्यानंतर या भूखंडावरील ३३ टक्के जागेवर वायकर यांनी बँक्वेट बांधले. गेली अनेक वर्षे या जागेवर लग्न, पार्टी असे अनधिकृत व्यवहार सुरू आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. आरोपांवरुन मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने प्राथमिक तपास सुरु केला आहे. आर्थिक गुन्हेशाखेने या प्रकरणात रवींद्र वायकर यांची पास तास कसून चाैकशी केली होती. त्यानंतर, हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने येत्या काळात वायकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगर पालिकेतील सहायक अभियंता संतोष मांडवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांडवकर यांच्या फिर्यादीनुसार, ते मुंबई महानगर पालिकेच्या के-पूर्व उत्तर विभाग येथील इमारत प्रस्ताव विभागात फेब्रुवारी २०२१ पासून कार्यरत आहेत. रविंद्र वायकर व अन्य संबंधितांनी मुंबई महानगर पालिकेची दिशाभूल करत विकास नियंत्रण नियमावली १९९१ खाली लाभ घेतला होता. मात्र त्याबाबतची माहीती हेतुपुरस्कररित्या लपवून पुन्हा नवीन विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ खाली अंधेरीतील व्यारवली गाव येथील भूखंड सार्वजनिक वापरासाठी असलेल्या राखीव भुखंडावर अवैधरीत्या तारांकीत हाॅटेलच्या बांधकामासाठी परवानगी मिळविल्याच्या तक्रारी पालिकेला आल्या. त्यानुसार पालिकेने तपास केला असता पालिकेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

सोमय्या यांच्या आरोपांवरुन आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक तपास सुरु करत वायकर यांना चाैकशीला हजर रहाण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानुसार वायकर हे शनिवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मुंबई पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची पाच तास चाैकशी करत जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास वायकर हे आर्थिक गुन्हेशाखेच्या कार्यालयातून बाहेर पडले. आवश्यकता भासल्यास वायकरांना पून्हा चाैकशीला बोलविण्यात येणार आहे.

पालिकेने नोंदविलेली निरिक्षणे..

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील व्यारवली गाव येथील कमाल अमरोही स्टुडिओ नावाच्या अमरोही परीवाराच्या मालकीच्या मिळकतीपैकी सुमारे आठ हजार चाैरस मिटरचा भूखंड रवींद्र वायकर, त्यांच्या पत्नी मनिषा वायकर, आसू निहलानी, राज लालचंदानी आणि प्रिथपालसिंग बिंद्रा यांनी नोटराईज्ड कराराव्दारे विकत घेतली. हा भूखंड हा मनोरंजन मैदान/बगीचा या स्वरुपात राखीव/आरजी भूखंड होता.

राखीव भूखंडाच्या मर्यादीत विकासकामाच्या अटी व शर्थी निश्चित करण्यासाठी ९ फेब्रुवारी २००४ ला जागा मालक महल पिक्चर्स प्रा. लि. आणि रवींद्र वायकर यांच्यासह अन्य चाैघे व संचालक (ईएसअॅन्डपी) मुंबई महानगर पालिका यांच्यात एक त्रिपक्षीय करार करण्यात आला. करारानुसार विकास नियंत्रण नियमावली १९९१अंतर्गत ६७ टक्के सार्वजनिक वापर (मनोरंजन मैदान तयार करून तो जनतेच्या मुक्त वापराकरिता राखीव ठेवण्याची तरतूद) व ३३ टक्के विकासकाम अशा रितीने जागेच्या विकासकामासाठी अटी आणि शर्थी निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, रवींद्र वायकर आणि अन्य चाैघांनी भूखंडाच्या ३३ टक्के भागावर मंजूर आराखड्यानुसार विकासकाम करून त्याचा वापर खेळ मनोरंजनाकरिता करणे अपेक्षित होते. उर्वरीत ६७ टक्के आरजी भूखंडाच्या भागावर बगीचा तयार करून तो मुक्त सार्वजनिक वापराकरिता उपलब्ध करून देणे आवश्यक होते.

रवींद्र वायकर आणि अन्य चाैघांनी संगनमत करुन कट रचत २००४ ते २०१९ या कालावधीत या भूखांडातील ३३ टक्के भूभागावर बैडमिंटन हॉलकरिता परवानगी प्राप्त असताना येथे सुप्रिमो बॅन्क्वेट नावाने लग्न समारंभ व अन्य कार्यक्रमाकरिता हॉल उभारून त्याचा व्यावसायिक आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापर केला. राखीव भूखंडाच्या सार्वजनिक वापरासाठी ठेवायच्या ६७ टक्के भागावरही लॉन उभारून तो कार्यक्रमांना व्यावसायिक वापरासाठी देऊन कोट्यावधीची कमाई केली.

मुंबई महापालिकेशी झालेल्या त्रिपक्षीय कराराव्दारे या राखीव भूखंडावरील हक्क महानगर पालिकेला दिलेले असतानाही ही बाब लपवून ठेवून वास्तुरचनाकाराच्या मदतीने २०१७ साली नविन विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ १७ (१) मध्ये असलेल्या तरतूदीचा फायदा घेण्याच्या हेतूने राखीव भूखंडाचा ७० टक्के भाग पालिकेला दिल्याचे दर्शवून ३० टक्के भाकावर सुमारे साडेतीन लाख चाैरस फुटांच्या प्रस्तावित १४ मजली तारांकीत हॉटेलच्या बांधकामासाठी २० जानेवारी २०२१ रोजी महानगर पालिकेकडून विकास परवानगी प्राप्त केली. प्रस्तावित हाॅटेलच्या बांधकामाव्दारे वायकर यांच्यासह अन्य चाैघांना कोट्यावधींचा फायदा होणार आहे.

मुंबई महानगर पालिकेने या संदर्भात राज्याच्या नगरविकास विभागाशी पत्रव्यवहार केल्यानंतर मुंबई महानगर पालिकेशी केलेल्या कराराची बाब लपविल्याचे स्पष्ट झाल्याने बांधकामास दिलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. याला वायकर आणि अन्य चाैघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.

 मी चाैकशीला हजर राहीलो. कायद्याच्या कक्षेत राहून गोष्टी केल्या आहेत. आर्थिक गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. माझ्यावर जाणून बुजून आरोप केले जात आहेत. माझी सत्याची बाजू आहे. मी सर्व चाैकशीला सामोरे जाईन. मी उद्धव ठाकरेंसोबत आहेत, असे यावेळी बोलताना सांगितले.

  • आमदार रवींद्र वायकर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT