Latest

गोव्यात फिरत्या हॉटेल्सला परवानगी

दिनेश चोरगे

पणजी; पुढारी वृत्तसेवा : चाकांवर संपूर्ण गोव्यात कुठेही फिरू शकणारे घर किंवा हॉटेल स्थापन करण्यास आता राज्यात मंजुरी मिळणार असून त्यासाठी पर्यटन खात्यांंतर्गत 'कॅराव्हेन धोरण' मंजूर करण्यात आले आहे. अशी कॅराव्हेन घरे व हॉटेल फक्त विदेशातच पाहायला मिळतात. आता या फिरत्या हॉटेल्सचे पर्यटकांना खास आकर्षण राहणार आहे.

हे धोरण सुरुवातीला तीन वर्षांसाठी असेल व नंतर आवश्यक असल्यास योग्य तो बदल करून नूतनीकरण करण्यात येणार आहे. या योजनांचा लाभ घेणार्‍यांना सरकार सूटही देणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी वाहतूक खाते आणि पर्यटन खात्याकडून परवाना घेणे आवश्यक राहणार आहे. या धोरणांंतर्गत कॅराव्हेन पार्क योजनाही मंजूर करण्यात आली आहे. या पार्कसाठी स्थानिक पंचायत किंवा पालिका, वीज खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, पाणीपुरवठा विभाग, गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरण, अन्न आणि औषध प्रशासनालय, बार परवाना, आरोग्य खाते, अग्निशमन दल, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून ना हरकत दाखला घेणे आवश्यक राहणार आहे. प्रत्येक कॅराव्हेनमध्ये दोन व्यक्तींसाठी झोपण्याची व्यवस्था, सोफासेट, फ्रिज, मायक्रोवेव्ह तसेच स्वयंपाकाची व्यवस्था, शुद्ध पाण्याची व्यवस्था, शौचालय, सांडपाणी बाहेर सोडण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे.

यापूर्वी नोंद झालेली ज्यांनी सेकंड हॅन्ड कॅराव्हेन घेतली असेल तर त्यांना वाहतूक करात सूट दिली जाणार आहे. जी कोणी व्यक्ती किमान दहा कॅराव्हेनसाठी अर्ज करेल त्यांनाच सरकारमार्फत इन्सेंटिव्ह देण्याचे या योजनेंतर्गत जाहीर करण्यात आले आहे.

इको फ्रेंडली कॅराव्हेनला प्राधान्य

इको फ्रेंडली कॅराव्हेनला प्राधान्य देण्यात येईल, असे या धोरणात नमूद करण्यात आले आहे. या कॅराव्हेनमध्ये वातानुकूलित यंत्रणा ध्वनी चलचित्र योजना राबवली जाऊ शकते, असे त्यात म्हटले आहे. कॅराव्हेन नोंदणीसाठी वाहतूक खात्याकडे दरवर्षी एक हजार रुपये फी भरावी लागणार आहे. पर्यटन खात्याकडे नोंदणी करण्यासाठी पहिल्या 10 कॅराव्हेनसाठी वीस लाख रुपये किंवा एकूण खर्चाच्या 25 टक्के कर भरावा लागणार आहे. 30 कॅराव्हेनसाठी दहा लाख रुपये किंवा एकूण खर्चाच्या पंधरा टक्के, 50 कॅराव्हेनसाठी पाच लाख किंवा एकूण खर्चाच्या दहा टक्के कर भरावा लागणार आहे.

SCROLL FOR NEXT